भार्इंदर : भाजपा आमदार नरेंद्र मेहता व महापौर गीता जैन यांच्या तक्रारींवरून काशिमीराच्या हद्दीतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर असलेल्या अनधिकृत बार व लॉजवर सोमवारी पालिकेने कारवाई केली. शहराच्या हद्दीतील दहिसर चेकनाका ते चेना गावादरम्यान असलेल्या महामार्गाच्या दुतर्फा अनेक अनधिकृत बार, लॉज व इतर अनधिकृत बांधकामे करण्यात आली होती. त्यातच येथे येणाऱ्या ग्राहकांसाठी पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था नसल्याने अनेक वाहने वाहतुकीच्या रस्त्यावरच उभी केली जातात. शिवाय, फेरीवाले व अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या रस्त्यांवरील थांब्यामुळे वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. याविरोधात अनेक तक्रारी करूनही त्यावर कारवाई होत नव्हती. २४ एप्रिल रोजी मेहता व जैन यांनी या परिसरात पाहणी दौरा केला होता. त्यात स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांना मात्र डावलण्यात आल्याने श्रेयाचे राजकारण चांगलेच तापले. पाहणी दौऱ्याच्या वेळी मेहता व जैन यांनी रस्त्यांलगत असलेली सर्व अनधिकृत बांधकामे हटविण्याची सूचना पालिका आयुक्त अच्युत हांगे यांना केली होती. त्यानुसार, सोमवारी अतिक्रमणविरोधी विभागाच्या पथकाने येथील नाइट लव्हर, मेला, एनएच ९, मिली, मिलेनियम, मानसी आदी बारसह समाधान, सरोजा, अमर पॅलेस या लॉजवर पोलिसांच्या बंदोबस्तात अनेक अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली. तसेच फेरीवाल्यांच्या अनधिकृत टपऱ्यांसह दुकानदारांचह वाढीव बांधकामेदेखील तोडण्यात आली. (प्रतिनिधी)
काशिमीरा येथील बार, लॉजसह अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा
By admin | Updated: May 12, 2015 03:36 IST