डोंबिवली: वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांपुढे पोलिस यंत्रणा पुरती हतबल ठरली असून या चोरांच्या बंदोबस्ताकामी नेमण्यात आलेली विशेष पथके तसेच केली जाणारी नाकाबंदी फोल ठरल्याने आता सोनसाखळी चोरटय़ांना पकडण्यासाठी नागरीकांनाच आवाहन करण्याची नामुष्की पोलिसांवर ओढावली आहे. सोनसाखळी चोरटयास पकडा आणि 15हजार रूपये रोख आणि प्रशिस्तपत्र मिळवा असे बॅनर रामनगर पोलिसांकडून शहरात लावण्यात आले आहेत.
सोनसाखळी चोरीच्या कल्याण डोंबिवली शहरात गेल्या तीन दिवसात 6 घटना घडल्या आहेत.या वाढत्या घटनांमुळे सध्या शहरातल्या प्रमुख चौकांमध्ये नाकाबंदी करून विशेष करून मोटारसायकलस्वारांची कसून तपासणी पोलिसांकडून सुरू आहे याउपरही चोरीच्या घटना सुरूच आहेत. दिपावलीच्या काळात तर या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली असून शनिवारी सकाळच्या सुमारास रामनगर पोलिसांच्या हद्दीत एका तासाच्या कालावधीत दोन महिलांच्या गळयातील सोन्याचा ऐवज लांबविल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आदल्या रात्री शुक्रवारी विष्णुनगर पोलिसांच्या हद्दीत देखील मंगळसूत्र लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. टिळकनगर परिसरात ही अशाच प्रकारे चोरीची घटना घडली आहे. डोंबिवली प्रमाणोच कल्याणमध्येही चोरीचे सत्र सुरूच असून शुक्रवारी कोळसेवाडी आणि एमएफसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही गेल्या दोन दिवसात सोनसाखळी चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. या वाढत्या घटनांनी पोलिस पुरते हैराण झाले असून आता त्यांनी चकक नागरीकांना आवाहन करणारे फलक जागोजागी लाऊन जनजागृती करण्याचा प्रय} केला आहे. प्रामुख्याने दक्ष नागरीकांसह रिक्षाचालक आणि फेरीवाले यांना आवाहन करण्यात आले असून सोनसाखळी चोरटयास पकडणा-याला 15 हजाराचे इनाम जाहीर करण्यात आले आहे. यातून एकप्रकारे पोलिसांची हतबलता समोर आली आहे. पोलिसांची कारवाई ही सुरूच आहे परंतु नागरीकांच्या सहभाग ही महत्वाचा आहे त्यामुळे रिक्षावाले आणि फेरीवाले यांना प्रामुख्याने आवाहन करण्यात आले असल्याचे सुनिल शिवरकर यांनी सांगितले.