विधानभवनाजवळ घडला प्रकार
मुंबई : विधानभवनजवळील शौचालयात काडतुसांनी भरलेले पिस्तूल आढळल्याने शुक्रवारी संध्याकाळी एकच खळबळ उडाली. मात्र थोडय़ाच वेळात हे पिस्तूल मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन ब्रँचचे शिपाई दत्तात्रय नळे यांचे असल्याचे स्पष्ट झाले. नैसर्गिक विधी आटोपताना नळे यांनी पिस्तूल शौचालयाच्या कठडय़ावर ठेवले होते. परतताना ते सोबत घेण्यास विसरले.
एका इंग्रजी वृत्तपत्रच्या वार्ताहराला गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांनी बंदोबस्त जोडून दिला आहे. नळे याच वार्ताहराच्या सुरक्षेसाठी तैनात होते. याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी शौचालयात सापडलेले पिस्तूल ताब्यात घेतले आहे. तसेच नळे यांचा जबाब नोंदवून पुढील कारवाई सुरू केली आहे. सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार या निष्काळजीपणाबाबत नळे यांची विभागीच चौकशी होणार आहे.
संध्याकाळी सातच्या सुमारास नळे या शौचालयात पिस्तूल विसरले. त्यांच्या मागून शौचालयात
आलेली व्यक्ती पिस्तूल पाहून घाबरली. या व्यक्तीने
नियंत्रण कक्षाला फोन करून पिस्तुलाबाबत माहिती
दिली. क्षणात मरिन ड्राइव्ह पोलीस तेथे धडकले. दरम्यान, नळे यांनाही पिस्तूल शौचालयात राहिल्याची जाणीव झाली. ते धावत धावत तेथे पोचले आणि पिस्तुलाचे गूढ उकलले. (प्रतिनिधी)