ठाणो : मद्यप्राशनविरोधी मोहीम राबविताना तसेच वाहतुकीचे नियमन करण्यासाठी पेट्रोलिंग करणारे आबासाहेब थोरात (52) यांना एका कंटेनरने उडविल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. घटनेनंतर वाहतूक पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग करून चालकाला अटक केली.
सईद अहमद नसरुद्दीन खान (35, रा. राजस्थान) असे या चालकाचे नाव आहे. तो प्लॅस्टिकच्या दाण्यांची वाहतूक करीत होता. चालक एक पाय आणि हाताने अपंग असूनही त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या ठाणोनगर उपशाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश संख्ये, जीपचालक यमगर, रायटर म्हामूणकर आणि आरटीपीसी थोरात हे खारेगाव टोलनाका येथे पहाटेच्या सुमारास गस्त घालत होते. त्यांना एचआर-74-4465 या क्रमांकाच्या नाशिक बाजूने आलेल्या कंटेनरचा क्रमांक संशयास्पद वाटल्याने रस्त्यावर उभे असलेल्या संख्ये, थोरात यांच्या पथकाने कंटेनरचालकाला थांबविण्याचा इशारा केला. मात्र, त्याने या पथकाला न जुमानता पुढे असलेल्या थोरात यांनाच चिरडून पुढे निघून गेला. यात ते जागीच ठार झाले. त्यानंतर, तातडीने पुढे नाकाबंदी करून या कंटेनरचा पाठलाग करून माजिवडय़ाजवळ खानला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, कळवा पोलीस अधिक तपास करीत आहेत. थोरात यांच्यामागे प}ी, मुलगा गणोश आणि तीन मुली असा परिवार आहे.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
वाहतुकीचे पेट्रोलिंग करताना थोरात यांचा मृत्यू झाल्यानंतर ठाणो जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर, त्यांचे पार्थिव भिवंडी भादवड पोलीस वसाहतीजवळील निवासस्थानी नेण्यात आले होते. तिथून त्यांच्या नाशिक जिल्ह्यातील देवाळा या मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.