Join us

पोलीस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दादरच्या नायगाव पोलीस वसाहतीतील इमारती धोकादायक ठरवत पोलीस कुटुंबीयांना घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दादरच्या नायगाव पोलीस वसाहतीतील इमारती धोकादायक ठरवत पोलीस कुटुंबीयांना घरे खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र, ही घरे व्यवस्थित असून त्यांच्या तात्पुरत्या डागडुजीची गरज आहे. म्हणूनच त्या घरांच्या दुरुस्तीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधीने पोलीस प्रशासनासोबत पाठपुरावा सुरू केला आहे.

याठिकाणी एकूण ५ इमारती आहेत. त्यात २०० ते २२० कुटुंबे राहण्यास आहेत. येथील इमारती धोकादायक असल्याने त्यांना ती खाली करण्याबाबत नोटीस पाठविण्यात आली आहे. यावेळी पोलीस पत्नीकड़ून इमारती खाली करण्याविरुद्ध आंदोलनही छेडले. यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच अनेक मान्यवर मंडळीनी रहिवाशांची भेट घेतली. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळेही याठिकाणी येऊन गेले.

याबाबत स्थानिक आमदारांंनी पुढाकार घेत येथील प्रश्न लावून धरला आहे. तसेच पोलीस प्रशासनासोबत त्यांचा पाठपुरावा देखील सुरू आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन नेमकी क़ाय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

येथील रहिवासी असलेल्या एका पोलिसाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुलांचे शिक्षण सुरू आहे. अशात नोटीस धाडून ई-आवास योजेनेद्वारे ज्या ठिकाणी घरे उपलब्ध आहेत अशाठिकाणी अर्ज करण्यास सांगण्यात येत आहे. इमारतीची वेळोवेळी दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करून योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे म्हटले. मुंबईत अनेक अतिधोकादायक इमारती आहेत. त्यावर काही कारवाई होत नाही. मात्र, आमच्या इमारती व्यवस्थित असताना देखील महिनाभरात दोन नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. हे चुकीचे असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

....

बदली नाट्य

येथील रहिवासी असलेल्या पोलिसाने दिलेल्या माहितीनुसार, घरे खाली करण्यास नकार देणाऱ्या पोलिसांची लांबच्या ठिकाणी बदली करण्यात येत आहे. जेणेकरून वैतागून त्यांनी घर सोडावे. बदली केलेल्या पोलिसांना पोलीस ठाण्याजवळील वसाहतीत राहण्याची व्यवस्था करण्याचेही सांगण्यात येत असल्याचे नमूद केले.

....

आम्हांला चांगल्या घरात राहण्याचा हक्क नाही का?

एका पोलीस शिपायाने दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्हांला चांगल्या घरात राहण्याचा अधिकार नाही आहे का? जिथे दुरुस्ती करून सर्व व्यवस्थित होऊ शकते तेथून काढण्याचा अट्टाहास का?. भविष्यात बीडीडी सारखे आम्हांलाही घरे मिळावी. मात्र, यासाठी पोलीस प्रशासनाची इच्छा असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.