Join us  

पोलिसाची रिव्हॉल्व्हर चोरणा-या दोघांना बेड्या, अंबोली पोलिसांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 4:00 AM

राज्य दहशतविरोधी विभागात (एटीएस) कार्यरत असलेल्या पोलिसाच्या पोलीस वसाहतीतील घरामध्ये घुसून तब्बल साडेतेरा तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि सर्व्हिस रिव्हॉल्व्हरसह ३० जिवंत काडतुसे चोरीप्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यास अंबोली पोलिसांना यश आले.

मुंबई : राज्य दहशतविरोधी विभागात (एटीएस) कार्यरत असलेल्या पोलिसाच्या पोलीस वसाहतीतील घरामध्ये घुसून तब्बल साडेतेरा तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि सर्व्हिस रिव्हॉल्व्हरसह ३० जिवंत काडतुसे चोरीप्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यास अंबोली पोलिसांना यश आले. घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या जोडप्यानेच पोलिसांच्या घरातील ऐवज लंपास करण्याचे धाडस केल्याचे तपासात उघड झाले.कमलजित कुलजित सिंग (१८), गुरुप्रित कुलजित सिंग (२३) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ९ एमएम पिस्तूल, २७ काडतुसांसह ३०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. कमलजित हा घरातील ऐवजावर डल्ला मारून तो माल पुढे नेण्याची जबाबदारी गुरुप्रितवर सोपवत असे. नाकाबंदीदरम्यान पोलीस महिलांकडे जास्त चौकशी करत नसल्याचा फायदा गुरुप्रितला व्हायचा.३० जुलै रोजी या दोघांनी रात्रीच्या सुमारास माझगावातील डॉकयार्ड रोड परिसरात असलेल्या बॉडीगार्ड पोलीस लाइनमध्ये प्रवेश केला. तेथील नीलेश मोहिते (४६) आणि त्यांच्या शेजारच्या घरातील कपाटामधील मौल्यवान ऐवजासह सर्व्हिस रिव्हॉल्व्हर आणि ३० जिवंत काडतुसे चोरी करून पळ काढला. मोहिते हे एटीएस विभागात कार्यरत आहेत. पोलीस वसाहतीतील आपले घर चोरट्याने लुटल्याचे समजताच गावी गेलेल्या मोहितेंनी घर गाठले. याबाबत भायखळा पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.हा तपास सुरू असतानाच अंबोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दया नायक यांनी घरफोडीच्या गुन्ह्यांत या कमलजित आणि गुरुप्रितला मंगळवारी अटक केली. तेव्हा त्यांच्या चौकशीत या गुन्ह्यांचीही उकल करण्यास नायक यांच्या पथकाला यश आले.

टॅग्स :गुन्हा