Join us
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक शौचालयातच उभारली पोलीस बीट चौकी

By admin | Updated: April 2, 2015 02:45 IST

रस्त्यामध्ये बाधित ठरत असलेली पोलीस बीट चौकी पालिका प्रशासनाने चक्क सार्वजनिक शौचालयामध्ये हलवण्याची तयारी सुरू केली आहे.

समीर कर्णुक, मुंबईरस्त्यामध्ये बाधित ठरत असलेली पोलीस बीट चौकी पालिका प्रशासनाने चक्क सार्वजनिक शौचालयामध्ये हलवण्याची तयारी सुरू केली आहे. या अजब कारभाराबाबत अ‍ॅण्टॉप हिल परिसरातील रहिवाशांकडून संतापाचा सूर उमटत असून पोलिसांनीदेखील या बीट चौकीत काम करणार नसल्याचा निर्धार केला आहे.अ‍ॅण्टॉप हिलमधील दर्गा रोड परिसर हा अतिसंवेदनशील मानला जातो. या भागात नेहमीच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहत असल्याने १५ ते २० वर्षांपूर्वी या ठिकाणी अ‍ॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यांतर्गत एक बीट चौकी उभारण्यात आली. कित्येक वर्षे या बीट चौकीची डागडुजी न झाल्याने सध्या या बीट चौकीची दुरवस्था आहे. मात्र तरीदेखील पोलीस अधिकारी या ठिकाणी निमूटपणे काम करतात. कधी कधी तर २४ तास ड्यूटी करावी लागत असल्याने काही वेळ याच ठिकाणी पोलिसांना आराम करावा लागतो. मात्र सध्या परिसरात पालिकेकडून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामात ही बीट चौकी अडथळा ठरत आहे. तसेच या बीट चौकीच्या बाजूलाच असलेले सार्वजनिक शौचालयदेखील रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित आहे. त्यामुळे पालिकेने हे शौचालय बाजूलाच असलेल्या बेस्ट डेपोच्या जागेवर हलवण्याचे ठरवले. त्यानुसार या शौचालयाचे काम पूर्णदेखील झाले आहे. मात्र बीट चौकीदेखील बाधित असल्याने पालिकेने या शौचालयामध्येच एका बाजूला बीट चौकीसाठी जागा दिली आहे. काही दिवसांतच पालिका ही बीट चौकी पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. मात्र बीट चौकी शौचालयाच्या बाजूला असल्याने या ठिकाणी मोठी दुर्गंधी येणार आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी कामच करू शकणार नाही. शिवाय ओव्हरटाइमनंतर काही मिनिटे आराम करायचा झाल्यास तो करणेही पोलिसांना अत्यंत जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे आपण येथे काम करू शकत नाही, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे. याबाबत अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांनी पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहून ही माहिती दिली आहे. तसेच परिसरातील जनसेवा संघ सामाजिक संस्थेचे संस्थापक सय्यद यांनीदेखील पालिकेच्या या अजब कारभाराबाबत पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्तांना पत्र लिहून यावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे.