नवी मुंबई : नवी मुंबईचा गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवादरम्यान शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावला जाणार असून साडेचार हजार पोलीस शहरात कार्यरत राहणार आहेत. वाहतूक पोलिसांनीही आवश्यक ठिकाणच्या मार्गात बदल करुन वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता ४६४ वाहतूक पोलीस कार्यरत ठेवले आहेत.शुक्रवारपासून शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गणेशभक्तांच्या उत्साहात कोणतेही विघ्न येवू नये याची खबरदारी नवी मुंबई पोलिसांकडून घेण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालय परिमंडळ १ मध्ये १६४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व सुमारे २१ हजार घरगुती गणपती आहेत. तर परिमंडळ २ मध्ये १९७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व ३५ हजार ५०० घरगुती गणपती आहेत. गणेशोत्सव मंडळांकडून नियमाचे उल्लंघन होवू नये यासाठी पोलिस आयुक्तालया मार्फत नुकत्याच मंडळांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यामध्ये खबरदारीच्या सूचना देत मंडळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून, सुरक्षा रक्षक नेमण्याचे सूचित करण्यात आले आहेत. पोलिसांतर्फे क्रिएटिव्ह फोर्स देखील तयार करण्यात आली आहे. याद्वारे प्रत्येक गैरहालचालीवर नजर ठेवली जाणार आहे. तर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. पोलिसांबरोबरच राज्य राखीव पोलिस बल, शीघ्र कृती दल, यांच्याही तुकड्या शहरात बंदोबस्तावर तैनात राहणार आहेत. कोकणाकडे जाणाऱ्या काही मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. या वाहनांनी पनवेल शहरात न जाता शहराबाहेरील पळस्पे फाटा मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिस उपआयुक्त अरविंद साळवे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
गणेशोत्सवासाठी पोलीस सज्ज
By admin | Updated: August 28, 2014 00:11 IST