Join us

सरकारविरुद्ध पोलीस पाटील मैदानात

By admin | Updated: July 18, 2015 01:33 IST

यवतमाळमधील पोलीस पाटलाची हत्या आणि कोपरगांव येथील पोलीस पाटलाला झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यातील शेकडो पोलीस पाटलांनी शुक्रवारी

मुंबई : यवतमाळमधील पोलीस पाटलाची हत्या आणि कोपरगांव येथील पोलीस पाटलाला झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवण्यासाठी राज्यातील शेकडो पोलीस पाटलांनी शुक्रवारी आझाद मैदानात आंदोलन केले. सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर ९ आॅगस्टला आॅगस्ट क्रांती दिनापासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशाराही महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनने दिला आहे.राज्यात सुमारे ३६ हजार पोलीस पाटील असून गाव पातळीवर जातीय सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम त्यांना देण्यात आले आहे. बदल्यात पोलीस पाटलांना दर महिन्याला ३ हजार रुपये इतके तुटपूंजे मानधन मिळते. जुलै महिन्यात यवतमाळमध्ये दारूबंदी चळवळीला साथ देणाऱ्या विरेंद्र राठोड या पोलीस पाटलाची हत्या करण्यात आली. तर कोपरगांव येथील वाळू माफियांना रोखणाऱ्या पोलीस पाटलाला बेदम मारहाणीची घटना घडली. परिणामी अवैध धंद्यांना रोख बसवणाऱ्या पोलीस पाटलांना कायद्याचे संरक्षण नसेल, तर काम करायचे तरी कसे, असा सवाल पोलीस पाटील असोसिएशनचे अध्यक्ष मोहन शिंगटे यांनी विचारला आहे.सद्यस्थितीत पोलीस पाटलांना जुगार, मटका, गौण खनिज उत्खनन असे अवैध धंदे बंद करण्याची कामे देण्यात आली आहेत. मात्र अशी कामे करताना कोणतेही संरक्षण दिले जात नाही. त्यामुळे यापुढे पोलीस पाटलाला योग्य संरक्षण देण्याची मागणी शिंगटे यांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या १५ वर्षांत २८हून अधिक पोलीस पाटलांची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती शिंगटे यांनी माहिती अधिकारात उघडकीस आणली आहे.