Join us  

कोसळधारेतही पोलीस ‘२४ तास आॅन ड्युटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 2:52 AM

माटुंगा येथील गांधी मार्केट परिसरात मोठ्या पावसात गुडघाभर पाणी जमा होते. परिणामी, येथील पाण्याचा निचरा होईपर्यंत वाहतूक बंद ठेवावी लागते.

मुंबई : माटुंगा येथील गांधी मार्केट परिसरात मोठ्या पावसात गुडघाभर पाणी जमा होते. परिणामी, येथील पाण्याचा निचरा होईपर्यंत वाहतूक बंद ठेवावी लागते. गांधी मार्केटपासून हाकेच्या अंतरावर सायन आणि माटुंगा पोलीस ठाणे आहे. दोन्ही ठाण्यातील पोलीस बांधव शनिवारपासून सुरू झालेल्या पावसामध्ये रस्त्यावर उभे राहून कार्य बजावत आहेत. मुंबईत कितीही पाऊस पडला, तरी पोलिसांना मात्र ‘२४ तास आॅन ड्युटी’ राहावे लागते, याचा प्रत्यय येथे आला.गांधी मार्केट परिसरात गुडघाभर पाण्यातून अवजड वाहने जातात. त्या वेळी पाण्याला लाटेचे स्वरूप येते. या लाटांचा प्रभाव प्रवाशांवर होऊन त्यांचा तोल जातो. रस्त्यावरील पाणी मॅनहोल्समधून बाहेर जावे, यासाठी मॅनहोलची झाकणे उघडी केली जातात. त्यामुळे मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना घडू नये, यावर पोलीस बारकाईने नजर ठेऊन असतात.माटुंगा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, किंग्ज सर्कल परिसरात आठ तास ड्युटीप्रमाणे पोलीस कर्मचारी तैनात असतात. सध्या माटुंगा पोलीस ठाण्यातील १० ते १२ कर्मचारी गांधी मार्केट परिसरात कार्यरत आहेत.गांधी मार्केट, मानव सेवा, सायन हॉस्पिटल, गुरुकृपा हॉटेल, भाऊ दाजी वस्तुसंग्रहालय या ठिकाणी सखल भागांत पावसाचे पाणी साचते. सायन पोलीस ठाण्यातील ५० ते ७० पोलीस कर्मचारी येथे बंदोबस्ताला असतात. अशी माहिती सायन पोलीस ठाण्यातर्फे देण्यात आली.

टॅग्स :पोलिसमुंबई