Join us

पोईसरमधून ५० हजार किलो प्लॅस्टिक काढले

By admin | Updated: April 10, 2017 06:29 IST

मुंबईतील मिठी, ओशिवरा, पोईसर आणि दहिसर नद्यांच्या संवर्धनासाठी रिव्हर मार्चने पुढाकार घेतला असून, या उपक्रमांतर्गत

मुंबई : मुंबईतील मिठी, ओशिवरा, पोईसर आणि दहिसर नद्यांच्या संवर्धनासाठी रिव्हर मार्चने पुढाकार घेतला असून, या उपक्रमांतर्गत रविवारी सकाळी पोईसर नदीच्या डहाणूकरवाडी आणि क्रांतिनगर येथील तब्बल ५० हजार किलो प्लॅस्टिक आणि गाळ उपसण्यात आला.रिव्हर मार्चकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत डहाणूकरवाडी भागातील नदीच्या पात्रातून १२ ते १५ ट्रक प्लॅस्टिक कचरा काढण्यात आला. नदीतला कचरा काढून लगतच ठेवण्यात आला असून, दोन दिवसांनी हा कचरा महापालिका उचलणार आहे. सध्या काढण्यात आलेल्या कचऱ्यात प्लॅस्टिकसह गाळाचा समावेश असून, दोन दिवसांनी तो सुकला की उचलला जाईल, असे रिव्हर मार्चच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. पोईसर नदीच्या स्वच्छतेसाठी यापूर्वीही प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यास योग्य प्रतिसाद मिळाला नाही. या वेळी मात्र, रिव्हर मार्च, महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसह स्थानिकांनी पाठिंबा दिल्याने मोहीम यशस्वी झाली, असे रिव्हर मार्चने सांगितले. दरम्यान, मोहिमेला महापालिकेचे विशेष अभियांत्रिकी व प्रकल्प संचालक लक्ष्मण व्हटकर, आमदार योगेश सागर आणि स्थानिक नगरसेवका प्रियंका मोरे यांनीही पाठिंबा दिला. (प्रतिनिधी)कांदिवली येथील क्रांतिनगर भाग नदीचे उगम स्रोत असून, रविवारी नदीच्या पात्रातील गाळ काढण्यात आला. अंधेरी, ठाणे आणि बोरीवली येथील स्थानिकांनी या कामी हातभार लावला, शिवाय विकासक आणि महापालिकेनेही पाठिंबा दिला. येथून सुमारे १२ हजार किलो गाळ आणि प्लॅस्टिक काढण्यात आले. दरम्यान, कामगारांच्या मदतीने १२ हजार किलो प्लॅस्टिक आणि गाळ, तर जेसीबीच्या मदतीने ४० हजार प्लॅस्टिक आणि गाळ काढण्यात आला.अनेक वेळा नदीत स्थानिकांकडूनच कचरा टाकला जातो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा तो दुसरीकडे टाकण्यासाठी उपाययोजना आखल्या जात नाहीत. मात्र, आता ही समस्या मार्गी लावण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. परिसरात जमा होणारा आणि नदीत टाकला जाणारा कचरा टाकण्यासाठीची व्यवस्था होईल़ नदीमध्ये अनेक वेळा मलजल सोडला जातो. परिणामी, नदी प्रदूषित होते. मलजलाची विल्हेवाट लावण्यासाठी येथे संबंधित प्रशासनासोबत बैठक घेत, बॉयोटॉयलेटच्या व्यवस्थेबाबत काम केले जाणार आहे, असे रिव्हर मार्चने सांगितले.