Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोहा मिल कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: July 14, 2014 23:19 IST

रोहा तालुका हा पूर्वीपासून भाताचे आगार म्हणून ओळखला जात असे. जया, सुवर्णा या भाताच्या वाणाचे बहुतांशी शेतकरी उत्पन्न घेत असत

रोहा : रोहा तालुका हा पूर्वीपासून भाताचे आगार म्हणून ओळखला जात असे. जया, सुवर्णा या भाताच्या वाणाचे बहुतांशी शेतकरी उत्पन्न घेत असत. यामुळे तालुक्यात अनेक भाताच्या पोहा गिरण्या चालू झाल्या. परंतु या भात व पोहा मिलवर अंकुश करणाराच नसल्याने येथील कामगारांना मूलभूत सोयी-सुविधा व सुरक्षा साधनांपासून वंचित राहावे लागत आहे.तालुक्यात एकूण पोहा मिलची संख्या व तेथील काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसंदर्भात तसेच वैद्यकीय चाचणी, शौचालयाची सुविधा, आराम करण्यासाठी जागा उपलब्ध आहे अथवा नाही याबाबत सहचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य रायगड यांच्याकडून माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता धक्कादायक वास्तव समोर आले. तालुक्यात आजमितीस १८ ते २० पोहा मिल गिरण्या अस्तित्वात आहेत. परंतु शासन दरबारी मात्र केवळ ९ पोहा मिलची नोंद आहे. त्या ९ पोहा मिलपैकी ८ पोहा मिल तालुक्यात एकाच दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी चालू झाल्या आहेत. यामध्ये भुवनेश्वर पोहा मिल, जय नागोबा फूड इंडस्ट्रीज, जय नागोबा पोहा सेंटर, न्यू भारत पोहा मिल, परब ब्रदर्स, संदीप पोहा मिल, सिंधुदुर्ग ट्रेडर्स व सचिन ट्रेडर्स यांचा समावेश आहे. या मिलमधून काम करणाऱ्या कामगारांना कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात येत नाहीत. शिवाय या कामगारांना काम करताना सुरक्षा साधने पुरविण्यात येतात की नाही याबाबत सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य रायगड यांचेकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. बहुतांशी मिलना कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याने भेटी दिलेल्या नाहीत अशी माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.गेली अनेक वर्षे या मिलमधून मालक वर्ग गब्बर बनले आहेत. मात्र भात विकण्यास येणाऱ्या शेतकऱ्याला मात्र भाताचा दर पाडून खरेदी होते. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना किमान वेतन या कायद्यानुसार वेतन दिले जात नाही, अशी माहिती या ठिकाणी काम करणाऱ्यांनी दिली आहे. बहुतांशी कामगार हे अशिक्षित असल्याने त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन मिलचालक या कामगारांची पिळवणूक करत आहेत. पोहा मिलमधून उडणाऱ्या भुकटीमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. प्रदूषणाबाबतच्या नियमावलीचे उल्लंघन करून या पोहा मिल चालविण्यात येत आहेत. यामुळे तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील पोहा मिलवर कोणाचा अंकुश आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)