Join us

अच्छे दिनचं स्वप्न दाखवून कोणते दिवस दाखवलेत?; पीएमसी खातेदारांचा मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 6:54 PM

आरबीआयकडून खातेदारांना तारीख पे तारीख

मुंबई: आर्थिक अनियमितता आढळल्यानं अडचणीत सापडलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेच्या खातेदारांच्या शिष्टमंडळानं आज आरबीआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी 30 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करू असं आश्वासन दिलं. त्यामुळे खातेदारांची दिवाळी अंधारात जाणार हे स्पष्ट आहे. शिष्टमंडळानं दिलेल्या आश्वासनानंतर लवकर तोडगा काढण्याची मागणी करत अच्छे दिनचं स्वप्न दाखवणाऱ्या मोदींनी कोणते दिवस आणलेत, असा प्रश्न उपस्थित केला. पीएमसी बँकेचे खातेदार काही दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. आज पीएमसी बँकेच्या खातेदारांची आरबीआयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्यानं याबद्दलचा निर्णय घेता येणं शक्य नसल्याचं आरबीआयच्या खातेदारांना सांगितलं. येत्या 25 आणि 27 तारखेला पीएमसी बँक प्रकरणी पुन्हा एकदा आरबीआयची बैठक होईल. त्यानंतर 30 तारखेला पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करण्यात येईल. पीएमसी बँकेच्या खातेदारांना सर्वोच्च न्यायालयानंदेखील दिलासा मिळालेला नाही. पीएमसी बँकेच्या काही खातेदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती. मात्र त्यावर सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला. न्यायालयानं याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्याची सूचना केली. पीएमसी बँकेवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे खातेधारकांना जास्तीत जास्त 25 हजार रुपये खात्यातून काढता येऊ शकतात. 

टॅग्स :पीएमसी बँकभारतीय रिझर्व्ह बँक