शैलेश चव्हाण, तळोजापरराज्यातील अवजड वाहनांची वाहतूक विभागाकडून टोविंग व्हॅनच्या नावावर सर्रास लूट केली जात असल्याचा प्रकार समोर येवू लागला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण होत आहे. या प्रकाराकडे प्रशासन फारसे लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे. पनवेल, कळंबोली, तळोजा या परिसरातील वाहतूक पोलिसांकडून सदर प्रकार होत असून विनाकारण बाहेरील राज्यातील अवजड वाहन चालक यामुळे त्रस्त झाले आहेत. सोमवारी सकाळी आंध्र प्रदेश येथील एका अवजड वाहनाला कळंबोली फुडलँड हायवे येथे अडविण्यात आले. वाहनाचे पेपर तपासल्यानंतर विनाकारण वाहनाला रिफ्लेक्टर पट्टे नाहीत असे सांगून, तुमको फाईन भरना पडेगा अशी तंबीच दिली. सदर चरण नामक चालकाने शासन नियमानुसार १०० रु. चा फाईन देवू केला, मात्र संबंधित वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी एकूण ६५० रुपयांची पावती हातावर ठेवताच चरण चक्रावून गेला. एवढे पैसे कसे असे विचारले असता, यात ५५० रुपयांची असलेली पावती टोविंग व्हॅनची असल्याचे सांगून त्या इसमाकडून ६५० रुपये घेण्यात आले.नवी मुंबई, वाशी तसेच कळंबोली स्टील मार्केट, तळोजा, उरण परिसरात दळणवळणाच्या कामानिमित्त परराज्यातून येणाऱ्या वाहनांचे प्रमाण मोठे असून वाहतूक पोलिसांच्या त्रासाला हे कंटाळलेले आहेत. गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा येथून आलेल्या वाहतूकदारांना अडवून कर्मचारी वाहन रस्त्याच्या कडेला लावून त्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगत असतात. वाहनाला टोचन लावल्याची पावती देवून पैसे घेतले जात असल्याचे समजते, तसेच हजारो किमी प्रवासाला जेवढा खर्च होत नाही तेवढाच याला लागतो असेही सांगितले. तर आम्हाला दर महिन्याला केसेस करण्याच्या वरिष्ठांच्या सूचना असल्याने आम्ही वाहनांवर कारवाई करीत असल्याचे एका वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
टोविंगच्या नावाखाली लूट
By admin | Updated: December 2, 2014 22:44 IST