Join us
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीचे चित्रण तीन वर्षांपूर्वीचे

By admin | Updated: February 19, 2016 03:25 IST

लोकल डब्यात दोन तरुणांना विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याची मोबाइल क्लिप बुधवारी समोर आली आणि या क्लिपनंतर रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) तपासाची सूत्रे हलविण्यात आली.

मुंबई : लोकल डब्यात दोन तरुणांना विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याची मोबाइल क्लिप बुधवारी समोर आली आणि या क्लिपनंतर रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) तपासाची सूत्रे हलविण्यात आली. संपूर्ण तपासांती ही मोबाइल क्लिप २0१३ मधील असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली. या प्रकरणी मारहाण झालेल्या तरुणाचा शोध घेऊन विचारपूस केली असता, अशी घटना घडल्याचे मान्य केले आणि त्यानंतर पोलिसांनी स्वत:हून दादर रेल्वे (मध्य) पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. मारहाण होत असलेल्या दोन तरुणांचा बराच शोध घेतला असता, यातील एक तरुण पोलिसांना सापडला. त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर मारहाणीची घटना घडल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. या तरुणाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लोकल डब्यातून प्रवास करताना, त्याच्या सहकाऱ्याने एका झोपलेल्या प्रवाशाच्या खिशात हात घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून ही घटना घडल्याचे त्याने सांगितले. याबाबत बोलताना रूपाली अंबुरे (लोहमार्ग, मध्य रेल्वे-पोलिस उपायुक्त) यांनी सांगितले, ‘मारहाण करण्यात आलेल्या तरुणांचा शोध सुरू आहे, तसेच ज्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे, त्याच्या सहकाऱ्याचाही शोध सुरू आहे.’(प्रतिनिधी)