Join us
Daily Top 2Weekly Top 5

सासणे आश्रमशाळेची दुर्दशा

By admin | Updated: December 14, 2014 23:19 IST

मुरबाड तालुक्यातील आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ५ शासकीय तर ३ खाजगी आश्रमशाळा सुरू आहेत.

सुधाकर वाघ/संदीप पष्टे, धसईमुरबाड तालुक्यातील आदिवासी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ५ शासकीय तर ३ खाजगी आश्रमशाळा सुरू आहेत. या शाळांतून तीन हजाराच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु, यातील सासणे (काचकोली) आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.मुरबाड तालुक्यातील आदिवासी बहुल परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी माळ, मोरोशी, खुटल (बा), मढ, काचकोली या शासकीय आश्रमशाळा सुरू आहेत. या आश्रमशाळांतील अनागोंदी कारभारामुळे आदिवासी मुलांच्या शिक्षणाचे तीनतेरा वाजले आहेत. महिन्यातून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा प्रति विद्यार्थी १५० ग्रॅम मटण देण्याऐवजी महिना-दोन महिन्यातून एकदाच तोही अपुराच आहार दिला जात आहे. जिथे रोज सफरचंद, केळी, अंडी दररोज द्यायला हवीत, तीही दररोज न देता दिवसाआड दिली जात असल्याचे विद्यार्थी सांगतात. गेले अनेक दिवस न्हाव्यालाही केस कापण्याठी आश्रमशाळेत बोलावणे केलेले नाही. असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी घरून आणलेल्या मळकट वास येणाऱ्या बिछान्यावरच झोपत आहेत. सासणे (काचकोली) आश्रमशाळेतील विद्यार्थी अंघोळीसाठी पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना १ किमी अंतर चालत जाऊन सकाळी ६.३० वाजता धरणाच्या पाण्यात जाऊन अंघोळ करावी लागत आहे. सध्याच्या कडाक्याच्या थंडीत रोज थंड पाण्याने अंघोळ करताना हुडहुडी भरते़ लहान मुलांना या थंडीमुळे खूप त्रास होतो. सचिन दरवडा या चौथीच्या अपंग विद्यार्थ्यालाही अंघोळीसाठी धरणाच्या पाण्यावर जावे लागते. थंडीचा त्रास होतो म्हणून मुले अंघोळी करून शेकोटीचा आसरा घेत आहेत. अशा प्रकारे सासणे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांप्रमाणे अन्य आश्रमशाळांतील मुलांनाही आग व पाण्याशी खेळ करून जीवघेणे शिक्षण घ्यावे लागत आहे. मुलींच्या बाथरूमचीही दुरवस्था झाली असल्याने मुलींनाही थंडपाण्याचा वापर करावा लागत आहे. सर्वच मुलींची बाथरूममध्ये सुविधा होत नसल्याने काही मुलींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रात्रीच्या वेळेस या शाळेतील मुला-मुलींना केवळ शिपायांच्या व एका महिला कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सोडून शाळेचे अधीक्षक घरी जात असतात. या शाळेतील अधीक्षकांच्या मनमानी कारभाराची प्रकल्प अधिकारीही दखल घेत नाही. या अधीक्षकाविषयी तक्रारी करूनही प्रकल्प अधिकारी कारवाई करीत नसल्याची चर्चा आहे.