नवी मुंबई : विमानतळबाधितांना त्यांच्या संपादित जमिनीचा मोबदला म्हणून देण्यात येणाऱ्या साडेबावीस टक्के भूखंड वाटपाची तिसरी सोडत रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही सोडत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काढण्याचे निश्चित करण्यात आले होते. विमानतळासाठी १० गावांतील ६७१ हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सिडकोने जवळजवळ पूर्ण केली आहे. त्या मोबदल्यात प्रकल्पग्रस्तांना उलवेजवळ पुष्पकनगरमध्ये साडेबावीस टक्के विकसित जमीन देण्यात येणार आहे. भूसंपादनासाठी संमतीपत्रे दिल्यानंतर त्यांना साडेबावीस टक्के भूखंडाचे वाटप करण्यात येणार आहे. भूसंपादनाची प्रक्रिया आता जवळजवळ पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने अॅवार्डचे काम हाती घेतले आहे. सध्या ६७१ हेक्टरपैकी ४०० हेक्टरपेक्षा अधिक जमीन साडेबावीस टक्केच्या सोडतीस पात्र असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी सिडकोला दिले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही सोडत काढण्याचे सिडकोने जाहीर केले होते. याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे ती लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येते. साडेबावीस टक्के भूखंड वाटपाची सर्व प्रकरणे एकाच सोडतीत पूर्ण करण्याचा निर्णय झाल्यामुळेच विलंब होणार आहे. (प्रतिनिधी)
साडेबावीस टक्के भूखंडाची सोडत लांबणीवर
By admin | Updated: December 18, 2014 23:42 IST