Join us

आरोपी बिजलानीची उच्च न्यायालयात याचिका

By admin | Updated: April 19, 2017 03:03 IST

नवी मुंबईचे बिल्डर सुनील लाहोरिया यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी जवाहर बिजलानीने त्याची हत्या करण्यासाठी सुपारी देणाऱ्यांचा तपास सीबीआय किंवा स्वतंत्र

मुंबई : नवी मुंबईचे बिल्डर सुनील लाहोरिया यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी जवाहर बिजलानीने त्याची हत्या करण्यासाठी सुपारी देणाऱ्यांचा तपास सीबीआय किंवा स्वतंत्र तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने पुढील आठवड्यात गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. जवाहर बिजलानी याच्यावर २०१३ मध्ये सुनील लाहोरिया हत्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या बिजलानी आर्थर रोड कारागृहात आहे. २०१६ मध्ये इचलकरंजी येथे अटक करण्यात आलेल्या स्वप्नील फटले याच्याकडे बिजलानीचा फोटो, गावठी पिस्तूल, आठ-दहा जिवंत काडतूसे आणि दहा हजार रुपयांची रोकड सापडली होती. मात्र या प्रकरणाचा तपास खोलवर करण्यात न आल्याने सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र तपास यंत्रणेकडे हा तपास वर्ग करण्यात यावा, यासाठी बिजलानीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती.बिजलानीच्या वकिलांनी दोषारोपपत्रात हत्येचा कट रचल्याबाबत काहीच उल्लेख नसल्याचे खंडपीठाला सांगितले.‘बिजलानीच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे हे प्रकरणी सीबीआय किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेकडे वर्ग करण्यात यावे,’ अशी विनंती बिजलानीच्या वकिलांनी खंडपीठाकडे केली. त्यावर खंडपीठाने याचिकेवरील सुनावणी एका आठवड्यानंतर ठेवत यावेळी गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)