कल्याण : भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे बीएसयूपी योजना वादग्रस्त ठरली असताना संथगतीने सुरू असलेल्या या प्रकल्पासंदर्भात शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा संघटक तात्या माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. विस्थापितांना तातडीने घरे मिळावीत, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.केडीएमसी क्षेत्रात सन २००७ पासून बीएसयूपी (शहरी गरिबांसाठी घरकुले) योजनेंतर्गत घरे बांधण्याची कामे सुरू आहेत. याअंतर्गत ८ हजार ८०० घरे बांधण्यात येणार असून डोंबिवलीतील आंबेडकरनगर वगळता बहुतांश ठिकाणचे प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. लवकरात लवकर ही कामे मार्गी लावून लाभार्थ्यांना घरे मिळावीत, या मागणीसाठी १४ जुलै रोजी महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लाक्षणिक उपोषण छेडले होते. या योजनेतील घोटाळ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत व्हावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली होती. विरोधकांनी प्रशासनाच्या कारभारावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असताना आता संथगतीने सुरू असलेल्या गृह प्रकल्पाबाबत सत्ताधारी शिवसेना पक्षाच्याच माजी नगरसेवक माने यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. पाथर्ली येथील इंदिरानगर परिसरातील बीएसयूपी प्रकल्पाबाबत त्यांनी याचिका दाखल केली आहे. या ठिकाणी १५ इमारती बांधणार असून ३ इमारतींचे काम अर्धवट स्थितीत आहे.
विस्थापितांना घरे मिळण्यासाठी याचिका
By admin | Updated: September 1, 2014 04:47 IST