मुंबई : ‘बुरा ना मानो होली है...’ म्हणत एखाद्याला रंग लावायला जाताना यंदा जरा जपूनच... असा सल्ला डॉक्टर सध्या मुंबईकरांना देत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून मुंबईत पसरणाऱ्या स्वाइन फ्लूच्या साथीमुळे रंगाचा बेरंग होण्याचा धोका आहे. स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार आहे. सर्दी, खोकला, ताप, डोळे लाल होणे, थकवा अशी लक्षणे असतील तर ‘त्या व्यक्तींनी होळी खेळू नये, आराम करावा’ असा सल्ला डॉक्टर देत आहेत.रंग खेळताना दुसऱ्या व्यक्तींशी जवळून संपर्क येतो. व्यक्तीला फ्लू झाला असेल आणि त्या व्यक्तीला रंग लावल्यावर तोच हात दुसऱ्याने स्वत:च्या नाकाला, तोंडाला लावल्यास संसर्ग होण्याचा धोका वाढतो. याद्वारे फ्लूच्या विषाणूने व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केल्यास जर त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर त्या व्यक्तीला स्वाइन फ्लूची लागण होऊ शकते. हे टाळण्यासाठी रंग खेळताना यंदा सर्वांनीच विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. अनिल पाचणेकर यांनी सांगितले. स्वाइनचा संसर्ग हा शिंकण्यातून, श्वासामार्फत आणि शिंकताना अथवा खोकताना उडणाऱ्या शिंतोड्यांमुळे होतो. संसर्ग झाल्यावरही त्याचा किती परिणाम होईल, हे त्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारशक्तीवर अवलंबून असते. यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप, अंगदुखी, डोळे लाल होणे, सुस्ती वाटणे, थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसून आलेल्या व्यक्तींनी रंग खेळायला घराबाहेर पडू नये. त्यांनी या दिवशी घरी बसून आराम करावा. स्वाइनचे लवकर निदान झाल्यास तो पूर्णपणे बरा होतो. स्वाइन फ्लूमुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. योग्य उपचार घ्या, असे डॉ. पाचणेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)डोळ्यांची अशी घ्या काळजी... कोणीही चेहऱ्याला रंग लावत असल्यास डोळे बंद करून घ्या, डोळ्यात रंग गेल्यास हात धुऊन डोळा स्वच्छ पाण्याने धुवा. पाण्याचा फुगा डोळ्यावर बसल्यास बर्फाने डोळा शेका. डोळा दुखायला लागला, लाल झाला तर तत्काळ डॉक्टरांना दाखवा. कॉन्टॅक्ट लेन्स घालून रंगपंचमी खेळायला जाऊ नकानैसर्गिक रंग कशापासून तयार कराल? बीट, हळकुंड, चंदन पावडर, फुलांच्या पाकळ्या, मेहेंदी, आवळा पावडरत्वचेची अशी घ्या काळजी...सुरक्षित रंगपंचमी खेळायची असेल तर फक्त पाण्याने अथवा नैसर्गिक रंगांनी खेळा. शरीराचा अधिकांश भाग झाकला जाईल असे कपडे घालून रंगपंचमी खेळा. रंगपंचमी खेळायला जाण्याआधी त्वचेला तेल अथवा क्रीम लावा. रंग काढण्यासाठी रॉकेल, लिंबाचा वापर करू नका. रंग काढण्यासाठी साबणाऐवजी दूध, बेसन लावावे. नखांमध्ये अडकलेला रंग काढण्यासाठी तीक्ष्ण वस्तूंचा वापर करू नका. सुक्या रंगाने रंगपंचमी खेळला असाल तर केस धुण्याआधी सर्व रंग झटकून काढारंगामुळे त्वचेला होणारा त्रास : त्वचा लाल होणे. पाण्याचे फोड येणे. अॅलर्जी असल्यास खाज सुटणे. त्वचेचे पापुद्रे निघणे. जास्त काळ कपडे ओले राहिल्यास कॅनडिडा होतो. कॅनडिडा म्हणजे शरीरातील ज्या भागांना घडी पडते म्हणजे हात, पाय अशा ठिकाणी संसर्ग होतो.लहान मुलांना सांभाळा! : लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती ही प्रौढ व्यक्तींच्या तुलनेने कमी असते. त्यात हवामानात होणाऱ्या बदलांचा पहिला परिणाम लहान मुलांवर होत असतो. यातच त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. एखाद्याला स्वाइनचा संसर्ग झाला असेल, तर तो मुलांमध्ये पसरण्याचा धोका वाढतो. यामुळे लहान मुलांना थोडाही त्रास झाल्यास त्यांना रंग खेळायला पाठवू नका, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे....‘त्यांची’ अशीही होळी!मुंबई : होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी अनेकांचे वेगवेगळे प्लॅन झाले असतील. कोणी मित्राकडे जाणार असेल, तर कोणी एखाद्या रिसॉर्टमध्ये रेन डान्सचा आनंद घेईल. काही तरुणांनी हटके करण्याचा विचार करत प्लास्टिक पिशव्यांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी हा कचरा जमा करणार आहेत. तर काही स्वयंसेवी संस्था कर्करोग रुग्णांसह रंगपंचमी साजरी करतील.याविषयी बोलताना रोट्रॅक्टर यशद म्हणाला,ा बहुतेक जण, रंगीत पाण्याच्या पिशव्या आणि फुगे फेकून रंगपंचमी साजरा करतात. या पिशव्यांचा रस्त्यावर अक्षरक्ष: कचरा होतो. त्यामुळे आमच्या टीमने हा प्लास्टिकचा कचरा जमा करुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला आहे..’‘यंदा ६ मार्चला रंगपंचमी कर्करोग रुग्णांसह साजरी करणार आहोत. टाटा रुग्णालयातील काही रुग्णांसह रंगांची उधळण करणार आहोत. ही अनोखी रंगपंचमी साजरी करण्यासाठी हिंदी, मराठी, भोजपुरी सिनेसृष्टीतील काही नामांकित कलाकारसुद्धा आनंदाने सहभागी होणार आहेत’,असे वाग्धारा संस्थेचे अध्यक्ष वगिश सारस्वत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी) बेसन आणि हळदीपासून तयार केलेल्या इकोफ्रेंडली रंगांपासून रंगपंचमी खेळणार आहोत. आमच्या वर्कशॉपमध्ये ७० अंध विद्यार्थी आहेत. येथे विविध महाविद्यालये, सामाजिक संस्था येऊन ही रंगपंचमी साजरी करणार आहेत’, असे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड (नॅब) संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक पूनम चोरडमल यांनी सांगितले.