Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅटफॉर्म तिकीट आता ५० रुपये, तरी स्थानकांवरील गर्दी ओसरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:06 IST

मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने महत्त्वाच्या स्टेशनवरील प्लॅटफार्म तिकीट १० रुपयांवरून, ५० रुपये केले आहे. ...

मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने महत्त्वाच्या स्टेशनवरील प्लॅटफार्म तिकीट १० रुपयांवरून, ५० रुपये केले आहे. मात्र, तरीदेखील स्टेशनवर जाणाऱ्या नागरिकांच्या संख्येत कुठलाही फरक पडला नाही. सध्या कोरोना काळातही लोकमान्य टिळक टर्मिनन्स स्टेशनवर प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या नातलगांची गर्दी दिसून येत आहे.

नातेवाइकांना, मित्रांना स्टेशनवर सोडण्यासाठी अनेक नागरिक प्लॅटफार्मवर जातात. यासाठी प्लॅटफार्म तिकीट काढणे बंधनकारक आहे. या तिकिटाची किंमत १० रुपये होती. मात्र, १ मार्चपासून हे तिकीट ५० रुपये करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाच्या पार्श्रभूमीवर स्टेशनवर येणाऱ्यांची संख्या कमी व्हावी, यासाठी प्लॅटफार्मचे तिकीट दर १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आले आहेत. काही कालावधीपुरती ही दरवाढ असली तरी, नागरिक वाढलेल्या किमतीचा विचार न करता ५० रुपयांप्रमाणे तिकीट काढून, प्लॅटफाॅर्मवर जातच आहेत. सध्या गाड्यांची संख्या कमी असली, तरी प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. त्यांना सोडण्यासाठी शुक्रवारी ३५०० नागरिकांनी प्लॅटफाॅर्म तिकीट काढले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने वाढविलेल्या दराचा कुठलाही परिणाम होत नसल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

दररोज ४६ रेल्वे धावत आहेत

सध्या कोरोनामुळे पॅसेंजर गाड्या बंद असून, फक्त कोरोना विशेष गाड्याच धावत आहेत. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनन्सवर दररोज २५ गाड्या येत आणि २१ गाड्या जात आहेत, तसेच या गाड्यांनी प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षण बंधनकारक करण्यात आले आहे.

दररोज २५ हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात

सध्या कोरोना काळात मोजक्याच गाड्या धावत असल्यामुळे गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. सद्य:स्थितीला २५ हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करीत असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. यामध्ये रेल्वेत २५ हजार प्रवाशांचे बुकिंग झाले आहे, तर काही ऑनलाइन बुकिंग केले आहे.

दररोज ३५०० प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री

मध्य रेल्वेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी १ मार्चपासून सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट दर १० वरून ५० रुपये केले आहे. एलटीटी स्थानकावर दररोज ३५०० प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री होत आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकावरील गर्दी कमी व्हावी यासाठी तिकीट दरात वाढ करण्यात आली आहे. दर वाढवल्याने गर्दी कमी झाली आहे. प्रवाशांनी अत्यावश्यक कामासाठीच प्लॅटफॉर्मवर जावे अन्यथा प्लॅटफॉर्मवर जाणे टाळावे.

शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

रेल्वे प्रशासनाने ५० रुपये प्लॅटफार्म तिकीट केल्यामुळे खिशाला भुर्दंड बसत आहे. स्टेशनमध्ये फक्त नातलगांना सोडण्यासाठी पाच मिनिटांचे काम असते, तरीदेखील रेल्वे प्रशासन ५० रुपये आकारणी करीत असल्यामुळे, यात प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत आहे.

राहुल गुप्ता, प्र‌वासी

जवळच्या प्र‌वाशांना स्टेशनवर सोडण्यासाठी येण्याशिवाय पर्याय नसतो. रेल्वे प्रशासनाने आता ५० रुपये प्लॅटफार्म तिकीट केल्यामुळे ते काढावे लागणार आहे. कोरोनामुळे ही दरवाढ केली असली, तरी ५० रुपयांपर्यंत दरवाढ योग्य नाही.

धनेश यादव, प्रवासी