Join us

प्रवाशाला बाहेर काढण्यासाठी तोडला प्लॅटफॉर्म

By admin | Updated: June 19, 2015 03:01 IST

ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडून अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. मात्र अशाच एका गॅपमधून २६ वर्षीय तरुणाला बाहेर

मुंबई : ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडून अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो. मात्र अशाच एका गॅपमधून २६ वर्षीय तरुणाला बाहेर काढण्यासाठी रेल्वे पोलिसांसह रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांना एक तास शर्थीचे प्रयत्न करावे लागल्याची घटना वांद्रे स्थानकात घडली. यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना प्लॅटफॉर्मही तोडावा लागला. यात जखमी तरुणाला सुखरूपपणे बाहेर काढल्यानंतर त्याला उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिनेश नर (२६) हा दादर ते डहाणू मेमू शटल सेवा पकडण्यासाठी वांद्रे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर उभा होता. ही ट्रेन संध्याकाळी ५.0२ च्या सुमारास आली असता मिनेश हा कोच नंबर २१0९२१ मध्ये चढत असतानाच त्याचा पाय घसरला आणि प्लॅटफॉर्म तसेच ट्रेनच्या गॅपमध्ये जाऊन अडकला. मिनेश पडल्याचे दिसताच ट्रेन सुरू होण्यापूर्वीच काही प्रवाशांनी डब्यातील आपत्कालीन चेन खेचून ट्रेन थांबविली आणि मदतीसाठी आरडाओरड केली. काही प्रवाशांनी याची माहिती तत्काळ आरपीएफ (रेल्वे सुरक्षा दल), जीआरपी (गर्व्हमेन्ट रेल्वे पोलीस) आणि स्टेशन मास्तरला दिली. या सर्वांकडून प्रवाशांच्या सहाय्याने मिनेशला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जाऊ लागले. मात्र ते अयशस्वी ठरत गेले. ट्रेन जागेवरून हलविल्यास मिनेशचा मृत्यूही होऊ शकत असल्याने त्याला बाहेर काढायचे कसे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला. अखेर एक तास शर्थीच्या प्रयत्नानंतर प्लॅटफॉर्म तोडून होताच मिनेशला बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत वांद्रे रेल्वे पोलीस स्थानकाचे (जीआरपी) पोलीस उपनिरीक्षक तानाजी हारळे यांनी सांगितले की, मिनेशला खरचटले आहे. मिनेश हा पालघरमधील बॉर्डी येथे राहतो. या घटनेनंतर ट्रेन संध्याकाळी ६.१५च्या सुमारास रवाना करण्यात आली.