मुंबई - मुंबईतील वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण कमी करून शाश्वत शहर बनविण्याच्या समान उद्देशाने ‘यूलू’ने अदानी इलेक्ट्रिसिटीसोबत भागीदारी केली. या भागीदानीनुसार, अदानी इलेक्ट्रिसिटी हे संपूर्ण मुंबईत विविध ठिकाणी ‘युलू’च्या ई-बाईक्सना ऊर्जा पुरवेल. अदानी इलेक्ट्रिसिटी व युलूने शहरात पुढील १८ महिन्यात ५०० हून अधिक बॅटरी बदलणाऱ्या स्थानकांची योजना आखली आहे.
युलूने नव्याने तयार केलेली ई-बाईक ‘युलू डीएफएक्स’ ही टिकाऊ असून, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कामगार वर्गाला सामना करावे लागणारे इंधनाचे वाढते दर, वैयक्तिक वाहने खरेदी करण्यातील त्यांची असमर्थता, चालक परवान्याचा अभाव यासारख्या आव्हानांचा सामना करण्यात सक्षम आहे. या स्थितीत प्रवासाच्या विद्युतीकरणाच्या दिशेने घेतलेला पुढाकार स्वच्छ व हरित पर्यावरण तयार करण्यात मदत करेल, असा दावा केला जात आहे.
युलू ई-बाईक्स बीकेसी आणि नवी मुंबईमध्ये कार्यरत असून, मुंबईच्या अधिक भागात विस्तारित करण्याची योजना आहे. बीकेसीमध्ये बॅटरी बदलून देणाऱ्या स्थानकाची स्थापना केली जाईल. गरजेनुसार संपूर्ण मुंबईत त्याचा विस्तार केला जाईल. युलू बाईकचे सह-संस्थापक अमित गुप्ता म्हणाले की, मुंबईच्या अनेक ठिकाणी २४ x ७ बॅटरी चार्जिंग व बॅटरी बदलण्याची स्थानके उभी केली जातील. मुंबईतील प्रवासाच्या विद्युतीकरणाच्या दिशेने हे पहिले पाऊल असेल. १८ महिन्यात मुंबईत ५०० इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी बदलण्याची स्थानके उभी करणार आहोत.