अलिबाग : रायगड जिल्ह्यात मध्यमवर्गीयांकरिता परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. कोकण म्हाडाच्या माध्यमातून अमलात येणाऱ्या या योजनेकरिता ‘लँड-बँक’ कार्यान्वित करून जमीन खरेदी करण्यास प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती रायगडचे नूतन पालकमंत्री सचिन अहिर यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यावर आज प्रथमच अहिर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नियोजन मंडळाची बैठक घेवून संपूर्ण जिल्ह्यातील कामांचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असलेल्या गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. जूनअखेर हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. ठेकेदार नियोजित मुदतीत काम पूर्ण करीत नसल्याने निर्माण झालेल्या समस्यांच्या अनुषंगाने येत्या काही दिवसांत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत बैठक घेवून त्यावर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गोवा राष्ट्रीय महामार्गाची पावसामुळे होणारी दरवर्षीची दुरवस्था ही गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या मनस्तापाची आणि आर्थिक भुर्दंडाची समस्या ठरत असते. या समस्येच्या पार्श्वभूमीवर महामार्ग विभाग, पोलीस, कोकण रेल्वे आणि एसटी महामंडळ यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन येत्या ३ आॅगस्ट रोजी करण्यात आले आहे. त्यामध्ये अंतिम नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जलमार्गांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यास अनुसरुन कोकणात सागरी मार्गांमध्ये वाढ करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
परवडणा-या घरांची योजना
By admin | Updated: July 14, 2014 22:54 IST