Join us

नियोजन : पोलीस भरतीबाबत धाकधूक कायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील पोलीस भरतीचा जीआर रद्द झाल्यानंतर शुक्रवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा साडेबारा हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील पोलीस भरतीचा जीआर रद्द झाल्यानंतर शुक्रवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुन्हा साडेबारा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार असल्याचे सांगितले. मात्र, तरुणांमध्ये या भरतीबाबत धाकधूक कायम आहे.

राज्यात मेगा पोलीस भरती होणार असल्याबाबत ४ जानेवारी रोजी विभागाने काढलेला जीआर रद्द करण्यात आल्याचे मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांचा हिरमोड झाला. अशातच अनेक वर्षांपासून करीत असलेली मेहनत व्यर्थ जाणार की काय, अशी भीती तरुणांमध्ये निर्माण झाली. त्यात शुक्रवारी देशमुख यांनी राज्यात १२ हजार ५३८ जागांसाठी पोलीस भरती होणार असल्याचे सांगितले. येत्या काही दिवसांत भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार असल्याचे नमूद केले. त्यामुळे पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, या भरतीबाबत तरुणांमध्ये धाकधूक कायम आहे.

....

भरतीबाबत संभ्रम

अनेक वर्षांपासून मोठी भरती झाली नाही. त्यात भरतीबाबतचा नव्याने काढलेला जीआर रद्द केल्यामुळे भरतीबाबत संभ्रम निर्माण झाला. त्यात आता पुन्हा पोलीस भरतीबाबत समजले. माझ्या कुटुंबियांना वाटते मी पोलीस व्हावे. त्यात आता ही भरती प्रक्रिया पार पडणार की नाही याबाबत चिंता कायम आहे.

संतोष पवार, नायगाव

.....

आमची प्रतीक्षा कधी संपणाऱ...

जोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही तोपर्यंत पोलीस भरतीबाबतचा संभ्रम कायम राहणार. त्यात प्रतीक्षा यादीतील उमेदवारांबाबत शासन अजूनही दखल घेताना दिसत नाही. २०१८ मध्ये राज्यभरात पोलीस शिपायांच्या ३२८७ पदांसाठी भरती झाली होती. यात प्रतीक्षा यादीत असलेल्या पोलिसांना सेवेत दाखल करून घ्यावे. आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून मदतीची अपेक्षा आहे. सध्या गावाकडेच राहत आहे.

गुरव विठ्ठल, प्रतीक्षा यादीतील उमेदवार नालासोपारा

.....

भरतीची प्रतीक्षा संपणार

मेगा भरतीच्या पुन्हा झालेल्या घोषणेमुळे आता तरी भरतीची प्रतीक्षा संपणार आहे. लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया पार पडेल हीच अपेक्षा आहे.

सुभाष पाटील, दादर

....