Join us

‘पिझ्झा बॉय’ला मारहाण

By admin | Updated: September 3, 2015 02:05 IST

प्राणीप्रेमी संघटनेच्या एका महिला सदस्याने पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला मंगळवारी भररस्त्यात बेदम मारहाण केली. एका भटक्या कुत्र्याला त्याने मोटारसायकलने धडक दिली़

गौरी टेंबकर-कलगुटकर ,मुंबईप्राणीप्रेमी संघटनेच्या एका महिला सदस्याने पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या २७ वर्षीय तरुणाला मंगळवारी भररस्त्यात बेदम मारहाण केली. एका भटक्या कुत्र्याला त्याने मोटारसायकलने धडक दिली़ त्यामुळे भररस्त्यात दहा ते पंधरा मिनिटे तिने या मुलावर हल्ला चढवला असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.सतीशकुमार सिंग असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे़ तो मोतीलाल नगर दोन येथे राहतो. त्याच्यावर हल्ला करणारी गौरी मराठे (२५) ही बोरीवलीची राहणारी आहे़ ती मालाडच्या एका फार्मा कंपनीत काम करते. तसेच ती मीरा रोडमधील एका प्राणीप्रेमी संघटनेची सदस्य आहे. बांगूरनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सिंग हा मालाडच्या कॉल सेंटरमध्ये पिझ्झा डिलिव्हरी करून मोटारसायकलवरून चिंचोली बंदर परिसरात असलेल्या त्यांच्या दुकानाच्या दिशेने परतत होता. येथील सिग्नलजवळ अचानक मराठे त्याच्यावर धावून गेली आणि तिने त्याला मारहाण केली. मारण्याचे कारण विचारले असता, कुत्र्याला मोटारसायकलने धडक का दिलीस, असे ती वारंवार बोलत होती. ‘मुळात मी कोणत्याही कुत्र्याला धडक दिली नव्हती. तरी देखील माझ्याकडून नकळत चूक झाली असेल तर त्यासाठी मी माफी मागतो, असे मी वारंवार सांगत होतो, सॉरी बोलत होतो. ती मात्र मला मारतच सुटली होती.’मुलगी असल्याने मी तिला प्रतिकारही करू शकत नव्हतो. अखेर पळत मी आमच्या दुकानात पोहोचलो. जिथे मी आमचे मालक धर्मेंद्र यादव यांना घडलेला प्रकार सांगितला, अशी माहिती सिंगने ‘लोकमत’शी बोलताना दिली. यादव आणि या घटनेचे प्रत्यक्षदर्शी मराठेला घेऊन बांगूर नगर पोलीस ठाण्यात आले.