मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आरे कॉलनीमधील रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्त्यांवरील खड्डे वाढतच असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे म्हणून येथील स्थानिकांनी आरे टोलनाक्यावर आंदोलन छेडत आवाज उठविला आहे.आरे कॉलनीमध्ये छोटा काश्मीर येथील तलावांत गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपला तरी अद्याप आरे कॉलनीतील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. दिनकरराव देसाई मार्ग, आदर्शनगर, रॉयल पाम, युनिट क्रमांक १३ आणि ७, मयूरनगर येथील सर्वच रस्ते खड्ड्यांत गेले आहेत. यापूर्वी तात्पुरती मलमपट्टी म्हणून येथील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये खडी टाकण्यात आली होती. परंतु पावसामुळे ती पुन्हा उखडली आणि परिस्थिती जैसे थे झाली, असे येथील रहिवासी सुनील कुमरे यांनी सांगितले. शिवाय आरे प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही याबाबत तक्रारी केल्या असून, यासंदर्भात काहीच कार्यवाही होत नसल्याने शनिवारी आरे टोलनाक्यावर स्थानिकांनी आंदोलन केल्याचे कुमरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आरेतल्या बाप्पांसमोर खड्ड्यांचे विघ्न!
By admin | Updated: August 11, 2014 04:19 IST