Join us

सहार गावात अनोख्या पद्धतीने खड्डे बुजवले

By मनोहर कुंभेजकर | Updated: July 29, 2023 18:40 IST

खड्डे बुजवण्यासाठी चक्क साहित्या सह टेम्पो घेतला भाड्याने!

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:मुंबईत सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहे.त्यात अंधेरी देखिल अपवाद नाही.मुंबईत सर्वत्र खड्डेच खड्डे,आणि गेली पालिका कुणीकडे असा एल्गार करत आज सकाळी वॉचडॉग फाउंडेशनने अंधेरी (पूर्व) सहार गावातील खड्डे गांधीगिरी करत अनोख्या पद्धतीने बुजवले.

आम्ही बांधकाम साहित्याने भरलेला एक टेम्पो चक्क भाड्याने घेतला आणि सहार येथील मुंबई विमानतळाच्या एटीएस कॉम्प्लेक्ससमोर मोठमोठे खड्डे असलेला पाणी साचलेला रस्ता या साहित्याने भरला. त्याआधी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या इतर राज्यातील आणि परदेशी पाहुण्यांना येथील खड्यांचे दर्शन होवू नये म्हणून रंगीबेरंगी छत्र्यांनी चक्क खड्डे झाकले अशी माहिती वॉचडॉग फाउंडेशचे विश्वस्तअ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी लोकमतला दिली.यावेळी वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त निकोलस आल्मेडा तसेच एन. रामा, भास्कर, क्लेटस मिस्किटा उपस्थित होते.

सुमारे तीन तास चाललेल्या या अनोख्या आंदोलनात फाऊंडेशनचे सदस्य, रिक्षा चालक आणि काही शाळकरी विद्यार्थी, मुंबईतील खड्डेमय रस्त्यांच्या समस्या मांडण्यासाठी सहार गावचे नागरिक सामील झाले होते. पालिका आयुक्त डॉ.इकबाल सिंह चहल यांनी सहारसह मुंबईत ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांकडे जातीने लक्ष घालून लवकर खड्डे बुजवावे आणि मुंबईकरांना खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी मुक्त करावे अशी मागणी पिमेंटा यांनी केली.

टॅग्स :मुंबई