मुंबई : कंपनीची रक्कम बँकेत भरण्यासाठी जात असलेल्या तरुणाला पिस्तुलाचा धाक दाखवत दोघा लुटारूंनी पाच लाखांची बॅग हिसकावून पळ काढण्याची घटना बुधवारी कांदिवलीत घडला. या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी दोन अनोळखी मोटारसायकलस्वारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.कांदिवली पश्चिमेच्या अखलाख नगरमधील यादव मनी ट्रेडिंग कंपनीत काम करणारा तक्रारदार सुशील यादव कांदिवली लिंक रोड परिसरातील एका बँकेत पाच लाख तीस हजार रुपयांची रोकड भरण्यासाठी जात असताना बॉम्बे टायर्स कंपनीजवळ एका मोटारसायकलने त्याला मागून धडक दिली. त्यावरून सुशीलचे त्या मोटारसायकलस्वारासोबत भांडण झाले. त्याने डोक्यावर हेल्मेट लावले होते. तसेच त्याने आणि त्याच्या साथीदाराने आपले चेहरे रुमालाने झाकले होते. भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाले. हे भांडण सोडविण्यासाठी इतर वाहनचालक आणि स्थानिक गोळा झाले. त्या वेळी अचानक मोटारसायकलस्वाराने खिशातून पिस्तूल काढून ते लोकांवर रोखले. तसेच त्याच्या साथीदाराने सुशीलच्या हातातील बॅग हिसकावली आणि दोघे बोरीवलीच्या दिशेने पसार झाले. पोलीस घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
पिस्तुलाचा धाक दाखवत लुटले
By admin | Updated: April 2, 2016 02:28 IST