Join us  

पायलटांच्या टंचाईमुळे इंडिगोची १३0 उड्डाणे रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 12:57 AM

पायलटांच्या भासत असलेल्या तीव्र टंचाईमुळे इंडिगो या कंपनीला विमानांची १३0 उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. रद्द करण्यात आलेली उड्डाणे इंडिगोच्या दररोज होत असलेल्या परिचालनाच्या १0 टक्के इतकी आहेत.

मुंबई : पायलटांच्या भासत असलेल्या तीव्र टंचाईमुळे इंडिगो या कंपनीला विमानांची १३0 उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. रद्द करण्यात आलेली उड्डाणे इंडिगोच्या दररोज होत असलेल्या परिचालनाच्या १0 टक्के इतकी आहेत. इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, ठरविण्यात आलेल्या वेळापत्रकानुसारच विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. वेळापत्रकापेक्षा अधिकचे एकही उड्डाण रद्द करण्यात आलेले नाही.गुरुग्रामस्थित स्वस्त विमानसेवा चालक कंपनी इंडिगो एकूण दररोज १,३00 उड्डाणांचे परिचालन करीत असते. सध्या कंपनीच्या ताफ्यात २१0 विमाने आहेत. कंपनीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतीत अधिकृत निवेदन जारी करण्याचे कंपनीने टाळले आहे. वृत्तसंस्थेने इंडिगोच्या प्रवक्त्यास, तसेच मुख्य परिचालन अधिकारी वॉल्फगँग प्रॉशॉवर यांना या विषयासंदर्भात एक प्रश्नावली पाठविली होती. अद्यापही यावर त्यांच्याकडून काहीही उत्तर आलेले नाही.सूत्रांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात शनिवारपासून कंपनीकडून उड्डाणे रद्द केली जात आहेत. गेल्या आठवड्यात दिल्ली-एनसीआर विभागास गारपीट आणि पावसाचा फटका बसला होता. त्याचे निमित्त साधून कंपनीने पहिल्यांदा विमानांची उड्डाणे रद्द केली होती. दररोज किमान ३0 उड्डाणे रद्द होतील, असे समजते. ३१ मार्चला उन्हाळी हंगाम सुरू होईल, तोपर्यंत कंपनीचे परिचालन सामान्य होईल, असे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :इंडिगो