तळोजा : कळंबोली परिसरातील गणेश मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या कठड्यावर रात्री उशिरापर्यंत तळीरामांचा तीर्थप्रसाद सुरू असून, हा तीर्थप्रसाद म्हणजे मद्य आणि मांस-मच्छीची मेजवानी सुरू असते.कळंबोली पोस्ट आॅफिसशेजारी केएल - ६ येथे असलेल्या गणेश मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या कठड्यावर रोज संध्याकाळी मोठ्या प्रमाणात तळीरामांचा डेरा बसतो. या ठिकाणी मद्य विक्री केंद्र (वाइन्स शॉप) असल्याने समोरच असलेल्या स्टील मार्केट परिसरातून मोठ्या प्रमाणावर चालक या ठिकाणी गर्दी करत आहेत. सोबत मांसाहारी पदार्थ देखील उपलब्ध होत असल्याने तळीराम इथेच आपली मैफिल रंगवत आहेत. हा सगळा प्रकार येथे असणाऱ्या गणेश मंदिराच्या बरोबर पाठीमागे होत आहे. रोज संध्याकाळी गणपती मंदिरात आरती तर दुसरीकडे तळीरामांचा ‘कार्यक्रम’ सुरू होत असल्याने गणेशभक्तांमध्ये नाराजीचा सूर पाहावयास मिळतो. हा सगळा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याचे स्थानिक रहिवासी सांगत असून या त्रासातून कायमची सुटका होण्यासाठी बाप्पाकडे साकडं घालत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष दिले पाहिजे, अशी येथील महिलांची मागणी आहे. (प्रतिनिधी)
मंदिरामागे तळीरामांचा तीर्थप्रसाद
By admin | Updated: May 15, 2015 23:13 IST