Join us

विथ फोटो : सिने स्थिर छायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सिने छायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचे हृदयविकाराने मुंबईतल्या राहत्या घरी निधन झाले. ते ७३ वर्षांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सिने छायाचित्रकार सुधाकर मुणगेकर यांचे हृदयविकाराने मुंबईतल्या राहत्या घरी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. अविवाहित होते. अनेक वर्षे ते एकटेच राहात होते. दामोदर कामत स्थापन केलेल्या कामत फोटो फ्लॅश या कंपनीमध्ये १९६६ साली वयाच्या १८व्या वर्षी ते फोटोग्राफर म्हणून रूजू झाले. वयाच्या अखेरपर्यंत फोटोग्राफर म्हणून काम करीत होते.

अनेक चित्रपटांचे स्थिरचित्रण त्यांनी केले होते. राज कपूर यांच्या आरके बॅनरनिर्मित मेरा नाम जोकर, बॉबी, सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग, धरम करम, हिना तसेच राजश्री प्रॉडक्शन्सच्या अखियोंके झरोखेसें, नादिया के पार, सारांश, उपहार, गीत गाता चल, चितचोर, मैने प्यार किया, एन. चंद्रा यांच्या नरसिंहासह जवळपास दीडशेहून अधिक हिंदी चित्रपटांच्या स्टील फोटोग्राफीचे काम केले आहे. मराठीमध्ये दामू केंकरे दिग्दर्शित सखी माझी, कुमार सोहनी दिग्दर्शित जोडीदार, तुझ्याचसाठी अशा अनेक मराठी चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिकांसाठी स्थिरचित्रण केले आहे. राज कपूर साहेब, देव आनंद, राजश्री प्रॉडक्शन्सचे बडजात्या, अभिनेत्री नर्गिस, मधुबाला, दिग्दर्शिका सई परांजपे, दामू केंकरे, एन. चंद्रा, श्रीकांत ठाकरे, कुमार सोहनी, सुभाष फडके या दिग्गजांसोबत सुधाकर मुणगेकर यांनी काम केले. मितभाषी असलेल्या सुधाकर मुणगेकर यांचे भगवान दादासह चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी स्नेहपूर्ण संबंध होते. कन्टीन्युटी फोटोग्राफीमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य होते.