Join us

फिनिक्स मॉलविरुद्ध दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

By admin | Updated: January 2, 2016 08:36 IST

थर्टीफर्स्टनिमित्त मॉल्समध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मॉलच्या सुरक्षेचा आढावा घेत असताना घाटकोपर येथील फिनिक्स मॉलमध्ये सुरक्षेबाबत निष्काळजीपणा कायम

मुंबई : थर्टीफर्स्टनिमित्त मॉल्समध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मॉलच्या सुरक्षेचा आढावा घेत असताना घाटकोपर येथील फिनिक्स मॉलमध्ये सुरक्षेबाबत निष्काळजीपणा कायम असल्याचे पोलिसांना आढळले. यापूर्वीही घाटकोपर पोलिसांनी या मॉलवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवून गुन्हा दाखल केला होता. त्यापाठोपाठ गुरुवारी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थर्टीफर्स्ट तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी पर्यटनस्थळांबरोबरच मॉलमध्येही गर्दी केली होती. त्यात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता. मॉलमधील सुरक्षाही तितकीच महत्त्वाची असल्याने त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आदेश पोलिसांनी मॉल प्रशासनाला दिले होते. त्यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकटेश पाटील यांनी फिनिक्स मॉलच्या सुरक्षेचा आढावा घेतला. या वेळी तपास पथकाला सुरक्षेत हलगर्जी दिसून आली. गुरुवारी हत्यार सोबत घेतलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी मॉलमध्ये सहज प्रवेश केला. तेव्हा त्यांना कुणीही हटकले नसल्याचे पाटील यांनी सांगितले. सुरक्षेतील हलगर्जीपणामुळे फिनिक्स मॉलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात या मॉलविरुद्ध सुरक्षेत हलगर्जी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरक्षेत सुधारणा करण्याबाबत वारंवार सूचना देऊनदेखील मॉल प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)