Join us

मुंबई विद्यापीठात सुरू होणार तत्त्वज्ञानावर आधारित पदवी, पदविका अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तत्त्वज्ञानाचे क्षेत्र अधिक समृद्ध करण्याच्या उद्दिष्टाने मुंबई विद्यापीठाचा तत्त्वज्ञान विभाग आणि कॉन्फडरेशन ऑफ श्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तत्त्वज्ञानाचे क्षेत्र अधिक समृद्ध करण्याच्या उद्दिष्टाने मुंबई विद्यापीठाचा तत्त्वज्ञान विभाग आणि कॉन्फडरेशन ऑफ श्री नारायण गुरू ऑर्गनायझेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारान्वये रुपये एक कोटीचा धनादेश कॉन्फेडरेशनच्या माध्यमातून विद्यापीठास सुपूर्द करण्यात आला. विद्यापीठात श्री नारायण गुरू यांचे तत्त्वज्ञान, शिकवण आणि विचार यांवर पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत.

महान संत, आध्यात्मिक गुरू, थोर समाजसुधारक, तत्त्वज्ञानी आणि केरळमधील शिक्षणतज्ज्ञ श्री नारायण गुरू यांच्या विचारांवर आणि तत्त्वज्ञानावर अभ्यास व्हावा, या दृष्टीने विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या दालनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. रामदास आत्राम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. रुपये एक कोटीच्या ठेवीतून या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना फेलोशिप, शैक्षणिक आणि प्रशासकीय खर्च केला जाणार आहे.

विद्यार्थी आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींचे चारित्र्य संपन्न करून नैतिक अधिष्ठान प्राप्तीसाठी आणि नारायण गुरू यांनी जातिविहीन समतावादी जगासाठी केलेल्या प्रयत्नांतून प्रेरणा मिळावी, यासाठीही हे अभ्यासक्रम महत्त्वाचे ठरणार असल्याचे मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

............................................