Join us
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलचे दर उतरले; रिक्षाभाडेही कमी करा

By admin | Updated: December 1, 2014 22:57 IST

गेल्या६ महिन्यांत ५ ते ६ वेळा पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाले असले तरी रिक्षाचालकांनी आपल्या दरात कपात केली नाही.

वसई : गेल्या६ महिन्यांत ५ ते ६ वेळा पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाले असले तरी रिक्षाचालकांनी आपल्या दरात कपात केली नाही. त्यामुळे प्रवासीवर्गात संताप आहे. पेट्रोल व डिझेलची दरवाढ झाली की, रिक्षाचालकांच्या संघटना सरसावतात व प्रवाशांना वेठीस धरून वाहतूक विभागाकडून दरवाढ करून घेतात. ही दरवाढ पेट्रोलच्या दरात वाढ झाल्यामुळे केली जात असे. आता पेट्रोलचे दर सतत उतरत असल्यामुळे प्रवासी भाडेही कमी झाले पाहिजे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.दोन वर्षांपूर्वी पेट्रोलच्या दरात सतत वाढ झाल्यामुळे रिक्षाचालकांच्या संघटनांनी दरवाढ करावी म्हणून आंदोलन केले होते. त्या वेळी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीमध्ये दरवाढ करून देण्यात आली. तसेच तीनपेक्षा अधिक प्रवासी न घेण्याचे ठरले होते. परंतु, कालांतराने रिक्षाचालकांनी वाहतूक पोलिसांना मॅनेज करून तीनपेक्षा अधिक प्रवासी कोंबण्यास सुरुवात केली. दरवाढ करण्यामागे पेट्रोलचे दर वाढल्याचे कारण होते, परंतु आता पेट्रोलचे दर सतत घसरत असल्यामुळे रिक्षा भाडेही कमी व्हायला हवे, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. यासंदर्भात जिल्हा वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने हस्तक्षेप करून प्रवाशांना न्याय मिळवून द्यावा, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)