मुंबई : कुर्ला पूर्वेकडील साबळे नगर परिसरात विमानतळाला इंधन (एअर टर्बाईन फ्युअल) पुरवठा करणारी भारत पेट्रोलियमची पाइपलाइन दुपारी 2च्या सुमारास फुटली. ‘येथे खोदू नका’ असा फलक असूनही रेल्वेच्या कंत्रटदाराने मजुरांकरवी खोदकाम केल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी कंत्रटदार, मजुरांविरोधात गुन्हा नोंदवला.
टिळकनगर रेल्वे स्थानकाजवळ महाराष्ट्र ब्रीकेटर्स या मध्य रेल्वेच्या कंत्रटदाराकडून संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू होते. दुपारी कंत्रटदार कंपनीचे मजूर खोदकाम करीत असताना अचानक शुभ्र रंगाच्या पेट्रोलचा फवारा उडाला. क्षणातच पेट्रोलचे पाट वाहू लागले. या घटनेमुळे मजूर घाबरले. त्यांनी आपल्या वरिष्ठांना ही बाब कळवली. त्यानंतर लगेचच तेथे अग्निशमन दल आणि नेहरू नगर पोलीस धडकले. अग्निशमन दलाने पाण्याचे फवारे मारले. चौकशीत ही पाइपलाइन भारत पेट्रोलियम कंपनीची असून, ती माहूल तेलशुद्धीकरण प्रकल्पातून विमानतळार्पयत जाते. तसेच यातून विमानांना लागणारा इंधनपुरवठा होतो, अशी माहिती पोलीस व अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर भारत पेट्रोलियम कंपनीलाही ही बाब कळविली. पुढे या फुटलेल्या पाइपलाइनची दुरुस्ती हाती घेण्यात आली. (प्रतिनिधी)
मजुरांनी ज्या ठिकाणी खोदकाम हाती घेतले तेथे भारत पेट्रोलियमने ‘येथे खोदू नका’ असा फलक उभारलेला होता. मात्र या फलकावरील सूचनेकडे कंत्रटदार कंपनी व मजुरांनी दुर्लक्ष केल्याची माहिती नेहरू नगर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे समजते.
या अपघातात 12 ते 15 लाखांचे इंधन वाया गेल्याची
माहितीही पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार अपघाताला जबाबदार धरून पोलिसांनी कंत्रटदार कंपनी व दोन मजुरांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवला. दोन मजुरांना ताब्यात घेऊन कारवाई केल्याची माहिती मिळते.