Join us

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ विमान इंधनाचा भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:06 IST

प्रवाशांच्या खिशाला झळ; सहा महिन्यांत २६ टक्क्यांनी महागलेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पेट्रोल-डिझेलने शंभरी गाठली असतानाच, विमान इंधन ...

प्रवाशांच्या खिशाला झळ; सहा महिन्यांत २६ टक्क्यांनी महागले

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पेट्रोल-डिझेलने शंभरी गाठली असतानाच, विमान इंधन दराचाही भडका उडाला आहे. गेल्या सहा महिन्यांत ‘एव्हीएशन फ्युएल’ जवळपास २६.८८ टक्क्यांनी महागले आहे.

इंधन महागले की, विमान प्रवाशांना दोन प्रकारे फटका बसतो. एक तर तिकिटाचे दर वाढतात आणि दुसरे म्हणजे विमान कंपन्या सवलतींना कात्री लावतात. कोरोनामुळे हवाई वाहतूक क्षेत्राचे चाक खोलात रुतले आहे. त्यामुळे या क्षेत्राला गती देण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालयाने अलीकडेच विमान तिकीट दराची किमान मर्यादा वाढविली. परिमाणस्वरूप देशांतर्गत विमान प्रवास १३ ते १६ टक्क्यांनी महागला. आता इंधन भडक्यामुळे विमान तिकिटांचे दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे.

कोरोना चाचणीचा अतिरिक्त खर्च आणि सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने खासगी वाहनासाठी जास्त पैसे मोजावे लागत असल्याने, आधीच सर्वसामान्य प्रवाशांना विमान प्रवास आवाक्याबाहेरचा वाटू लागला आहे. त्यात आता आणखी तिकीट वाढल्यास प्रवासीसंख्या पूर्वपदावर येणार कशी, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

* मुंबईतील प्रवाशांवर अतिरिक्त भार

मुंबई विमानतळावर विकास शुल्क वसुलीस आणखी वर्षभर मुदतवाढ दिल्याने प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे. देशांतर्गत प्रवाशांकडून १२० रुपये, तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ७२० रुपये विकासशुल्क आकारले जाते. ३१ मार्च, २०२२ पर्यंत प्रवाशांच्या तिकिटावर हा अधिभार लावला जाईल.

* मुंबईतील विमान इंधनाचे दर

महिना ... दर (किलोलीटर)

जानेवारी ..... ४९,०८४ रुपये

फेब्रुवारी .... ५१,९०० रुपये

मार्च ..... ५७,९१९ रुपये

एप्रिल .... ५६,४७९ रुपये

मे .... ५९,८२२ रुपये

जून .... ६२,२७९ रुपये

-------------------------------