Join us

पर्ससीन एलईडी, पर्ससीन नेट विध्वंसक मासेमारीविरोधात राज्यभर मच्छीमार आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई- पर्ससीन एलईडी व पर्ससीन नेट या विध्वंसक मासेमारी बंदीबाबत राज्य सरकारने त्वरित निर्णय घेतला नाही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई- पर्ससीन एलईडी व पर्ससीन नेट या विध्वंसक मासेमारी बंदीबाबत राज्य सरकारने त्वरित निर्णय घेतला नाही तर राज्यभर मच्छीमारांचे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने दिला आहे.

पर्ससीन एलईडी व पर्ससीन नेट या विध्वंसक मासेमारीबाबत महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांची मढ कोळीवाड्यात भेट घेतली असता त्यांनी समितीची भूमिका विशद केली.

पर्ससीन एलईडी व पर्ससीन नेट मासेमारी या विध्वंसक मासेमारी बंदीबाबत व नौका जप्त करण्याचा मसुदा तयार आहे. जिल्हा सल्लागार समितीच्या बैठका संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक घेत नाहीत. मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करून जे कायदे आहेत, त्यांची अंमलबजावणी करीत नाहीत. परिणामी समुद्रातील मत्स्यसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

एलईडी पर्ससीन व पर्ससीन नेट मासेमारीमुळे

पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाने त्याची त्वरित दखल घेऊन विध्वंसक एलईडी पर्ससीन, पर्ससीन नेट व हायस्पीड मासेमारीवर बंदी आणावी; अन्यथा महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती राज्यभर आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा किरण कोळी यांनी दिला.

मंडणगड गुहागर दापोली मच्छिमार संघर्ष समितीच्या आंदोलनाला समर्थन दर्शविण्यासाठी महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या शिष्टमंडळाने दापोली, रत्नागिरी येथे अंदोलनात सहभागी होऊन समर्थन दिले. तसेच मालवण, सिंधुदुर्ग येथे सुरू असलेल्या आंदोलनातील नेते मिथुन मालवणकर यांच्याशी मोबाईलवरून चर्चा करून त्यांना पाठिंबा जाहीर केला अशी माहिती त्यांनी दिली.

या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, किरण कोळी, मोरेश्र्वर कोळी व अनिल तांडेल तसेच दापोली मंडणगड गुहागर मच्छिमार संघर्ष समितीचे कार्यध्यक्ष बाळकृष्ण पावसे, उपाध्यक्ष प्रकाश रघुवीर, सचिव गोपीचंद चोगले, सदस्य महिंद्र चोगले, सोमनाथ पावशे, आदी मान्यवर उपस्थित होते.