Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा १० वर्षांपासून छळ

By admin | Updated: August 24, 2015 02:03 IST

शरीरसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या महिलेला शेजारी राहणाऱ्या एका इसमाकडून गेली १० वर्षे शारीरिक आणि मानसिक छळ सोसावा लागत आहे. याबाबत महिलेने अनेकदा दहिसर

अदिती चव्हाण, मुंबईशरीरसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या महिलेला शेजारी राहणाऱ्या एका इसमाकडून गेली १० वर्षे शारीरिक आणि मानसिक छळ सोसावा लागत आहे. याबाबत महिलेने अनेकदा दहिसर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. मात्र पोलिसांकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने आत्महत्या करण्याचा विचार सतावत असल्याचे या महिलेने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दहिसर येथील संभाजी नगरमध्ये गेल्या २८ वर्षांपासून ही ४० वर्षीय पीडित महिला तिच्या १५ वर्षीय मुलासोबत राहते. तिच्याच घरासमोर नराधम इसमदेखील राहत असून, त्याला अनेक वर्षांपासून दारूचे व्यसन आहे. मुलगा शाळेत गेल्यानंतर ही महिला घरात एकटीच असते. ही संधी साधत या नराधमाने अनेकदा या महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने त्याला नकार दिल्याने गेली १० वर्षे हा नराधम या महिलेचा लैंगिक आणि मानसिक छळ करीत आहे. दारूच्या नशेत मध्यरात्री घरात घुसून महिलेवर अतिप्रसंग करणे, तिच्या दरवाजावर लाथा मारणे, तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करणे असे प्रकार रोजच या इसमाकडून होत आहेत. एका खासगी शाळेत शिक्षिका असलेल्या या महिलेने या छळाबद्दल दहिसर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दिल्या. मात्र पोलिसांनी यामध्ये केवळ विनयभंगासारखे साधे कलम लावून त्याच्यावर कारवाई केली. त्यामुळे एक ते दोन दिवसांत जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा या इसमाचे महिलेला त्रास देणे सुरूच असते. त्याच्या या दादागिरी आणि रोजच्या कटकटीमुळे इमारतीत राहणाऱ्या अनेकांनी घर सोडून दुसरीकडे जाणे स्वीकारले आहे. मात्र महिलेला दुसरा आधारच नसल्याने गेली १० वर्षे ती या नराधमाचा त्रास मुकाटपणे सहन करीत आहे.