Join us

पालिकेकडून शाळांतील परीक्षांना परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगरपालिकेने विविध शिक्षण मंडळांना परीक्षांची पूर्वनियोजित तयारी, पूर्वपरीक्षा यांच्या तयारीसाठी तसेच प्रत्यक्ष परीक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने विविध शिक्षण मंडळांना परीक्षांची पूर्वनियोजित तयारी, पूर्वपरीक्षा यांच्या तयारीसाठी तसेच प्रत्यक्ष परीक्षा (ऑफलाइन परीक्षा) घेण्याची परवानगी दिली. यात राज्य मंडळासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बोर्डांचा समावेश आहे.

कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या खबरदारीच्या उपायांसह नियोजित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून परीक्षा घेण्याची परवानगी पालिकेने दिली आहे. यासंबंधीची सूचना महानगरपालिका शिक्षण विभागाने मंगळवारी जारी केली.

यापूर्वी कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने १५ जानेवारीपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात मंगळवारी उशिरा मुंबई महापालिकेने आदेश जारी केले. केंब्रिज मंडळाच्या नववी ते बारावीच्या फेब्रुवारी-मार्च सत्राच्या काही विषयांच्या परीक्षा २३ जानेवारीपासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंब्रिज मंडळ इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आयोजित करू शकते तर अन्य मंडळे म्हणजेच राज्य मंडळ, सीबीएसई, आयबी, आयसीएसई हे बोर्ड घोषित केलेल्या आणि घोषणा करणार असलेल्या सर्व दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेऊ शकतात, असे पालिका शिक्षण विभागाने स्पष्ट केले. आरोग्यविषयक सर्व खबरदारीचे उपाय, स्वच्छता, सुरक्षेसंबंधी मार्गदर्शक तत्त्वे आदींचे शाळांनी काटेकोर पालन करायचे आहे.

* शहरातील शाळा कधी सुरू होणार याकडे लक्ष

शहरातील शैक्षणिक संस्था, कनिष्ठ महाविद्यालये १८ जानेवारीपासून सुरू करण्यात येतील, अशी माहिती मिळत असली तरी अद्याप त्याच्यावर अंतिम निर्णय बाकी असल्याने या शाळा नेमक्या कधी सुरू हाेणार, याकडे शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

.........................................