मुंबई : महापालिकेची आर्थिक नाडी हातात असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्षपद आपल्याकडेच कायम राखून शिवसेनेने पुन्हा एकदा मित्रपक्ष भाजपाच्या तोंडाला पानं पुसली़ या बदल्यात भाजपाला बेस्ट उपक्रमाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे़ तसेच गेली चार वर्षे भाजपाकडे असलेले शिक्षण समितीचे अध्यक्षपदही पुन्हा शिवसेनेकडे आले आहे़वैधानिक, विशेष व प्रभाग समिती अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आहे़ त्यामुळे नवीन अध्यक्ष निवडून आणण्यात येणार आहे़ या निवडणुकांसाठी शिक्षण व स्थायी समिती अध्यक्षपदाकरिता उमेदवारी अर्ज आज भरण्यात आला़ पुढचे वर्ष महापालिका निवडणुकीचे असल्याने तत्पूर्वी होणाऱ्या पालिकेच्या अंतर्गत निवडणुकांविषयी उत्सुकता आहे़ या निवडणुकांवरुनच शिवसेना भाजपा युतीमधील गणितही स्पष्ट होणार आहे़ मात्र महत्वाच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद यंदाही भाजपाला आपल्याकडे वळविता आलेले नाही़ स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे यशोधर फणसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे़ स्थायी समितीवर हक्क सांगणाऱ्या भाजपाच्या हातावर शिवसेनेने अशी तुरी दिल्यामुळे भाजपामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे़ गेली चार वर्षे भाजपाकडे असलेले शिक्षण समितीचे अध्यक्षपदी यंदा शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी दिली आहे़ ५ एप्रिल रोजी स्थायी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे़ (प्रतिनिधी)
‘स्थायी’चे अध्यक्षपद शिवसेनेकडे
By admin | Updated: April 2, 2016 01:43 IST