Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयात सामान्यांना प्रवेश हवाच

By admin | Updated: May 22, 2014 03:22 IST

महापालिकेच्या मुख्यालयात सामान्य नागरिकांना फक्त दुपारी ३ ते ५ दरम्यान प्रवेश देण्यात येत आहे.

नवी मुंबई : महापालिकेच्या मुख्यालयात सामान्य नागरिकांना फक्त दुपारी ३ ते ५ दरम्यान प्रवेश देण्यात येत आहे. ही जाचक अट काढून कार्यालयीन वेळेत सर्वांना प्रवेश द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँगे्रसच्या माजी नगरसेवकांनी केली आहे. नवीन मुख्यालय हे शहरातील सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिक व पामबीच रोडवरून जाणारे नागरिक आवर्जून मुख्यालय पाहण्यासाठी येत आहेत. कामानिमित्तही नागरिक या ठिकाणी येत असतात. परंतु प्रशासनाने दुपारी ३ ते ५ या वेळेतच सामान्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी ‘लोकमत’ने आवाज उठविताच लोकप्रतिनिधींनीही नाराजी व्यक्त केली आहे. माजी नगरसेवक भरत जाधव यांनी आज महापौर व आयुक्तांना पत्र देऊन मुख्यालय सर्वांना कार्यालयीन वेळेत खुले ठेवण्याची मागणी केली आहे. पालिकेच्या जाचक अटीमुळे नागरिकांमध्ये चीड निर्माण होऊ शकते. यामुळे प्रशासनाने हा निर्णय मागे घ्यावा. सुरक्षेसाठी येणार्‍या सर्व नागरिकांची नोंद करणे, त्यांची ओळखपत्रे पाहणे, मेटल डिटेक्टर बसविणे व इतर उपाययोजना करण्यात याव्यात. मुख्यालयाची वास्तू नवीन असल्यामुळे अनेक नागरिक ती पाहण्यासाठी येत आहेत. प्रवेशद्वारातून त्यांना परत पाठविले तर नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असे मत भरत जाधव यांनी पत्रामध्ये व्यक्त केले आहे.