Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईकरांसाठी आजपासून पेंग्विन दर्शन होणार खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 02:03 IST

Penguin : टाळेबंदीच्या कालावधीमध्ये वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते. जेणेकरून विषाणूचा संसर्ग फैलावणार नाही.

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय १५ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुले होत आहे. प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या नागरिकांनी वावरताना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया आणि पाच वर्षांखालील लहान मुलांनी शक्‍यतो प्राणिसंग्रहालयास भेट देणे टाळावे अथवा विशेष काळजी घ्‍यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.टाळेबंदीच्या कालावधीमध्ये वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते. जेणेकरून विषाणूचा संसर्ग फैलावणार नाही. संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर प्राणिसंग्रहालय पुनश्च जनतेसाठी खुले करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. प्रवेश करताना मास्कचा वापर अनिवार्य असेल. वाहनधारकांनी वाहनांची चाके निर्जंतुकीकरण फवारणी करूनच प्राणिसंग्रहालयात प्रवेश करावा. तिकीट खिडकीजवळ आखून दिलेल्या जागेवरच रांगेत उभे राहावे. सोबत कमीत कमी साहित्य आणावे.प्रवेशद्वाराजवळ हात निर्जंतुकीकरण करूनच उद्यानात प्रवेश करावा. समूहाने फिरू नये. प्राणी पाहण्यासाठी गर्दी करू नये. काचेला अथवा बॅरिकेडला स्पर्श करू नये. थुंकू नये. मास्क व हातमोजे इतरत्र न फेकता जागोजागी ठेवण्यात आलेल्या विशिष्ट कचऱ्याच्या डब्यात टाकावे. कोणतेही खाद्यपदार्थ आणू नये. सिंगल यूज प्लॅस्टिक बॉटल आणू नयेत. प्रसाधनगृहाचा उपयोग केल्यानंतर तेथे लिक्विड सोपने हात धुवावेत. पाणी पिण्याआधी हात निर्जंतुकीकरण करून घ्यावेत. पाणपक्ष्यांची प्रदर्शनी विशेष काळजी म्हणून तात्पुरती बंद असेल.

टॅग्स :मुंबई