मुंबई : मुलुंड-गोरेगाव लिंक रोडच्या रस्ता विस्तारीकरणाचा मुद्दा मुलुंडच्या प्रभाग क्रमांक १०८मध्ये केंद्रस्थानी असणार आहे. गेल्या २० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे या वर्षी तरी हा मुद्दा मार्गी लागेल का? की पुन्हा आश्वासनांमध्ये राहणार? या संभ्रमात येथील मतदार आहेत.प्रभाग क्रमांक १०३ आणि ९८ मिळून १०८ हा नवा प्रभाग बनला आहे. हा प्रभाग उत्तरेकडे गुरुगोविंद सिंग रोड, पूर्वेकडे पुरुषोत्तम सरोज रोड, दक्षिणेकडे टी व एस विभाग सामायिक सीमा व पश्चिमेकडे भांडुप कॉम्प्लेक्सची कुंपण भिंत या सीमेमध्ये बंदिस्त आहे. तसेच या प्रभागात राहुल नगर, मोती नगर, हनुमानपाडा, आशा नगर आदी विभागांचा समावेश आहे. मुख्यत्वे पूर्वीच्या वॉर्ड क्र. ९८मधील सुमारे १५ ते २० हजार मतदारांचा या नव्या १०८ प्रभागात समावेश करण्यात आला आहे.मात्र गेली २० वर्षांहून अधिक काळ गोरेगाव - लिंक रोडचे विस्तारीकरण होईल, असे आश्वासन दिले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे पालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. तहीरी दरवेळेस नकाशे प्रसिद्ध केले जातात मात्र कामास चालना नाही. याचमुळे नाहूर रेल्वे पुलाचे रुंदीकरण आणि नाहूर रेल्वे स्टेशन ते गोरेगाव लिंक रोडला जोडणारा पादचारी पूलही रखडलेला आहे. तसेच नाहुर ते फोर्टीज इस्पितळापर्यंत स्कायवॉक बांधण्यात येणार होता, ते कामही रखडले आहे. तसेच या रस्त्यामुळे बाधितग्रस्तांचे पुनर्वसन इत्यादी मुद्देही या निवडणुकीत कळीचे ठरणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुलुंड पश्चिम रेल्वे स्टेशनच्या जे.एन. रोड ते गोरेगाव लिंक रोडपर्यंत स्कायवॉक होणार होता. तो राजकारणामुळे रद्द करण्यात आला. मात्र या रस्त्यावर पिलरसाठी खणलेला रस्ता आजही वाईट अवस्थेत आहे. तसेच रात्रौ ९ वाजता जे. एन. रोडवर रिक्षावाल्यांची पार्किंग, बंद पडलेले स्ट्रीट लाईट, गदुल्ले व दारुड्यांचा वावर यावर कोणाचेही नियंत्रण नाही. तसेच वनजमीन कायद्यात बाधित होणाऱ्या झोपडपट्टी विभागाचा याच प्रभागात समावेश केल्याने हा नवीन प्रश्नही कळीचा मुद्दा ठरणार आहे. (प्रतिनिधी)
रस्ता रुंदीकरणाचा मुद्दा प्रलंबित
By admin | Updated: January 26, 2017 03:44 IST