Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून विनमास्क प्रवास केल्यास ५०० रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या लाटेला थोपविण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या लाटेला थोपविण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून प्रयत्न केला जात आहे. आता रेल्वे प्रशासनानेही मोठे पाऊल उचलले असून, रेल्वेतून विनामास्क प्रवास केल्यास ५०० रुपये दंड वसूल करण्यात येईल.

सध्या संपूर्ण देशात ९० टक्के प्रवासी रेल्वे गाड्या धावत आहेत. अनेक जण विनामास्क रेल्वे प्रवास करीत असल्याचे निर्दशनास येत आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने देशभरातील सर्व झोनल रेल्वे कार्यालयांना विनामास्क रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर ५०० रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे तिकीट तपासणीस आता प्रवाशांच्या तिकिटाबरोबरच त्याने मास्क घातला आहे की नाही, हे सुद्धा तपासणार आहेत. मास्क नसल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. हा आदेश पुढील सहा महिने लागू असेल.

* आता रेल्वेस्थानकावर क्लीन मार्शल दिसणार नाहीत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल सेवा १ फेब्रुवारीपासून मर्यादित वेळेत सुरू झाली हाेती. मात्र, लोकल प्रवासात विनामास्क प्रवास करणाऱ्याची संख्या वाढली होती. त्यांच्यावर कारवाईसाठी रेल्वेस्थानकावर पालिकेने क्लीनअप मार्शल आणि पालिका कर्मचारी मिळून ५०० पेक्षा जास्त जणांचे पथक तैनात केले होते. मात्र, आता भारतीय रेल्वेने विनामास्क प्रवाशांवर कारवाईचे आदेश सर्व झोनल रेल्वे कार्यालयांनाच दिल्याने त्यांच्याकडूनच कारवाई हाेईल. त्यामुळे रेल्वेस्थानकांवर क्लीनअप मार्शल दिसणार नाहीत.

................................................