मुंबई : मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने मुंबई विमानतळ प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार विमानतळ परिसरात कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्यास १००० रुपये दंड आकारला जाणार आहे.
विमानतळावर बरेच प्रवासी सामाजिक अंतर नियमांचे पालन करीत नाहीत. काही जण विनामास्क फिरतात, तर काही प्रवाशांचा मास्क हनुवटीखाली ओढलेला असतो. वारंवार सूचना करूनही प्रवासी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे अशा प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्याची सूचना विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) देण्यात आली.
डीजीसीएच्या सूचनेनुसार मुंबई विमानतळावर कोरोना प्रतिबंध नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १००० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. १ एप्रिलपासून या कारवाईस सुरुवात करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली.