पनवेल : संपूर्ण पनवेल शहरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात आज शेतकरी कामगार पक्षाने पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी शहरातील रस्ते येत्या दहा दिवसात दुरुस्त केले जातील,अशी ग्वाही पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी शेकापच्या शिष्टमंडळाला दिली.पावसाळ्यापूर्वी तब्बल साडेतीन कोटी रुपये खर्च करून पालिकेने संपूर्ण पनवेल शहरातील रस्त्याचे डांबरीकरण केले होते. परंतु रस्त्यांच्या या निकृष्ट दर्जाच्या कामांची पावसाने पोलखोल केली. त्यामुळे शहरातील रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले. शेतकरी कामगार पक्षाने यापूर्वीही शहरातील खड्ड्यांविरोधात ठिकठिकाणी बॅनर लावून निषेध व्यक्त केला होता. आज शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालिकेवर धडक दिली. खड्डे बुजवा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा असा इशारा यावेळी पालिकेला देण्यात आला.यावेळी पालिकेचे विरोधी पक्ष नेते संदीप पाटील यांनी ज्या ठेकेदारांनी हे निकृष्ट दर्जाचे रस्ते बनविले त्यांच्याकडूनच हे रस्ते पुन्हा त्याच पैशात बनवून घ्यावेत, अशी मागणी केली. याप्रसंगी शेकाप शहर चिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक श्वेता बहिरा, अनुराधा ठोकळ, समीर ठाकूर, प्रितम म्हात्रे, गणेश कडू, माजी नगरसेवक सुनिल बहिरा, माधुरी गोसावी, आरीफ पटेल, पुष्पलता मढवी, सुनिता ठक्कर, कुमार ठाकूर आदिंसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
पनवेलच्या खड्ड्यांविरोधात शेकापचा मोर्चा
By admin | Updated: August 12, 2014 04:15 IST