ठाणे : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असून बाजारात विविध प्रकारचे आकर्षक मखर विक्रीसाठी आले आहेत. मखर पुठ्ठ्याचे असो किंवा थर्माकोलचे, परंतु ते बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापेक्षा कारागिरांची मेहनत, कलाकौशल्य आणि डायच्या माध्यमातून होणारा विजेचा मोठा वापर यामुळे साहित्याच्या तुलनेत मखरांची किंमत तीन पट अधिक लावली जाते. वाढत्या महागाईमुळे यंदा बाप्पाच्या मूर्तीपेक्षा मखरांचीच किंमत जास्त आहे. आकर्षक आणि विविध आकारांतील थर्माकोलच्या मखरांना सध्या मोठी मागणी आहे. मुळात थर्माकोलच्या २ ते ४ इंच जाडीच्या ३ ते ४ शिट्समध्ये सुमारे दोन फुटांचे मखर होते. मोठ्या प्रमाणात मखरे बनणाऱ्या कारखान्यांमध्ये डायच्या साहाय्याने आकार दिले जातात. डायचा उपयोग करून एका मिनिटात थर्माकोलच्या अनेक शिट्सना आकार देता येत असला तरी यात मोठ्या प्रमाणात विजेचा वापर होतो. याशिवाय, हॅण्ड कटरचा वापर करून काही जण कलाकुसर करतात. तसेच स्प्रेच्या साहाय्याने रंगाचा हलका थर दिला जातो. अधिक आकर्षक बनवण्यासाठी डायमंड, मोती लावले जातात. या सगळ्यांचा खर्च जास्त नसला तरी विजेचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर आणि कारागिरांची मेहनत यावर मखरांची किंमत ठरते. मखरांचे मोठे कारखाने हे पनवेल, नवी मुंबईत असून तिथून हे दादर, ठाणे, कल्याणच्या बाजारपेठांमध्ये विक्रीला आणले जातात. मूळ कारखान्यातील किमतीच्या तुलनेत दुकानात विक्रीसाठी ठेवताना याच्या किमतीत आणखी २५ ते ३० टक्क्यांनी वाढ केली जाते. (प्रतिनिधी)
मूर्तींपेक्षा मखर महाग
By admin | Updated: August 26, 2014 01:39 IST