Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत आजपासून दीड महिन्याच्या बालकांना पीसीव्ही लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:08 IST

मुंबई : दीड महिन्याच्या बालकांना ‘न्‍युमोनिया’ व इतर ‘न्‍युमोकोकल’ आजारांपासून संरक्षण देणारी ‘न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ मंगळवारपासून देण्यात येणार आहे. ...

मुंबई : दीड महिन्याच्या बालकांना ‘न्‍युमोनिया’ व इतर ‘न्‍युमोकोकल’ आजारांपासून संरक्षण देणारी ‘न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन’ मंगळवारपासून देण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पालिका आरोग्‍य केंद्र व रुग्णालयांतील आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी ९ ते दु. १ या वेळेत ही लस मोफत दिली जाणार आहे.

राज्‍य शासनाच्‍या निर्देशांनुसार १३ जुलैपासून लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात दीड महिन्याच्या बालकांना डोस देण्यात येणार आहे. हे लसीकरण मुंबईतील २०८ ठिकाणी करण्यात येणार आहे. या लसीकरणाच्‍या पूर्वतयारीसाठी संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्‍यात आले आहे. तसेच या लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्‍यात येत आहे. त्याचबरोबर लस, सिरींजेस व इतर सामुग्रीच्या वितरणाची व्‍यवस्‍थादेखील करण्‍यात आली असल्याची माहिती अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

* विस्‍तारित लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत बीसीजी, पोलिओ, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपेटाइसिस-बी, एच इन्फ्लुएंझा-बी, रोटा वायरस, गोवर, रुबेला या आजारावर प्रतिबंधक लस देण्यात येते.

* सन २०१० मध्ये ‘न्युमोकोकल’ या आजाराने देशात पाच वर्षांखालील अंदाजे एक लाख बालमृत्यूंची नोंद झाली होती, तर त्याचवर्षी देशभरात पाच ते सहा लाख बालकांना ‘न्युमोनिया’ हा गंभीर आजार झाला होता.

* ‘स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया’ या जीवाणूमुळे ‘न्युमोकोकल’ हा संसर्गजन्य आजार होतो. हा आजार म्‍हणजे फुप्फुसांना होणारा एक प्रकारचा संसर्ग आहे. या आजारामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो, धाप लागते, ताप व खोकलाही येतो. संसर्ग गंभीर स्वरूपाचा असल्‍यास मेंदुज्वर, नुमोनिया सेप्टीसीमीया अशा कारणामुळे मृत्यू देखील ओढवू शकतो.