अजित मांडके, ठाणेआघाडीबाबत अद्याप स्पष्ट नसताना काँग्रेसने आपली पहिली ११८ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात ठाणे शहरातून नारायण पवार, ओवळा-माजिवडा मतदारसंघातून प्रभात पाटील आणि भिवंडी पश्चिममधून शोएब खान यांना उमेदवारी मिळाली आहे. परंतु, या जागांसाठी इच्छूक असलेल्या अनेकांची घोर निराशा झाली. त्यामुळे ते कोणता पवित्रा घेतात, हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यात ओवळा-माजिवडा मतदारसंघातून इच्छुक असलेले ठाणे शहर काँगे्रसचे अध्यक्ष बाळ पूर्णेकर आणि भिवंडी पश्चिममध्ये माजी खासदार सुरेश टावरे गटाला मोठा हादरा बसला आहे. ठाणे शहर मतदारसंघातून काँग्रेसचे माजी गटनेते नारायण पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. या ठिकाणी सुभाष कानडे, राजेश जाधव आदी मंडळी इच्छूक होती. परंतु, कानडे यांचा दोन वेळा येथून पराभव झाला होता. असे असताना देखील त्यांचे नाव शर्यतीत होते. परंतु त्यांचा पत्ता येथून पक्षाने कट केला आहे. पवार हे सध्या काँग्रेसचे नगरसेवक असून सलग तीन वेळा ते निवडून आले आहेत. नगरसेवक निवडणुकीत एकदा त्यांना पराभवाची धूळही चाखावी लागली आहे. परंतु, स्वत:च्या प्रभागाव्यतिरिक्त विधानसभा मतदारसंघावर त्यांचा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे त्यांच्या पारड्यात मतदार मते टाकतील का, याबाबत मात्र साशंकता आहे. दुसरीकडे ओवळा-माजिवडा मतदारसंघातून इच्छूकांच्या रेसमध्ये असलेले काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर यांचादेखील पत्ता दुसऱ्यांदा कट झाला आहे. मागील वेळेसही तिकीट मिळेल, अशी अपेक्षा त्यांची होती. परंतु, ऐनवेळेस दिलीप देहरकर यांच्या गळ्यात ही माळ पडली. यंदादेखील त्यांचे नाव पुन्हा आघाडीवर होते. परंतु, त्यांना उमेदवारी न देता स्थानिकालाच उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी मीरा-भार्इंदरमधील पक्षाच्या सहा पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. ठाण्यात पक्षाच्या झालेल्या पडझडीला तेच जबाबदार असल्याचे दोषारोपही त्यांच्यावर ठेवण्यात आले होते. असे असतानासुद्धा आपल्या पारड्यात तिकीट पडावे, यासाठी त्यांनी थेट दिल्लीला चार दिवस तळ ठोकला होता. परंतु, त्यांची घोर निराशा झाली असून अपेक्षेप्रमाणे श्रेष्ठींनी यंदा स्थानिकाला प्राधान्य देऊन मीरा-भार्इंदरमधील प्रभात पाटील या कार्यकर्तीला तिकीट देऊन महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. पाटील या पाच वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. या जागेसाठी हंसकुमार पांडे, लक्ष्मण जंगम, अॅड. एस.ए. खान आदींची नावेही चर्चेत होती. परंतु, लक्ष्मण जंगम यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. पाटील या आमदार मुझफफर हुसेन यांच्या गटातील मानल्या जातात.
पवार, पाटील, खान यांना काँग्रेसची उमेदवारी
By admin | Updated: September 26, 2014 00:55 IST